Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर एफडीएची कारवाई; पदार्थाचे नमुने ताब्यात हॉटेल केले सील

अंबाजोगाईतील चायनीज सेंटरवर एफडीएची कारवाई; पदार्थाचे नमुने ताब्यात हॉटेल केले सील

बीड, 04 ऑगस्ट (हिं.स.)। नागरिकांच्या आरोग्याशी बेजबाबदारपणे खेळणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंबाजोगाईतील एका चायनीज सेंटर्सवर अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई केली.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ऑनलाइन तक्रारीची तातडीने दखल घेत सदर बाजार भागातील तवक्कल चायनीज सेंटरवर ही धाड टाकण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांनी ही कारवाई करत हॉटेलचा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

अंबाजोगाई आणि केज परिसरातून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन बीडचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या तपासणीदरम्यान तवक्कल चायनीज सेंटरचे मालक इम्रान अनवर कुरेशी हे विनापरवाना व अनारोग्यदायी वातावरणात व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये सर्वत्र अस्वच्छता आढळून आली. पथकाने खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अन्नपदार्थ व कच्च्या साहित्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अन्वये आवश्यक परवाना मिळेपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून, इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत माहिती मिळताच सदर बाजार भागातील इतर बहुतांशी हॉटेल्स, मांसविक्रीची दुकाने कारवाईच्या भीतीने लगोलग बंद करून व्यावसायिक पसार झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi