Dailyhunt
अमेरिकेचे विमान पाकिस्तानात दाखल, इराण चर्चेसाठी तयार नाही

अमेरिकेचे विमान पाकिस्तानात दाखल, इराण चर्चेसाठी तयार नाही

स्लामाबाद , 20 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे शिष्टमंडळ सोमवारी (२० एप्रिल) पाकिस्तानमध्ये पोहचले आहे. उपलब्ध माहितीनुसार, अमेरिकेचे एक व्हीव्हीआयपी विमान नूर खान एअरबेसवर उतरले आहे.

मात्र, यावेळी इराण चर्चेसाठी तयार नसल्याचे दिसत आहे.

वृत्तानुसार, इराणने संकेत दिले आहेत की सध्या अमेरिकेसोबत चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही. दुसऱ्या फेरीतील चर्चेपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. मुनीर यांनी ट्रम्प यांना सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिकेची नाकेबंदी ही इराणसोबतच्या चर्चेत अडथळा ठरत आहे. यावर ट्रम्प यांनी या मुद्द्यावर विचार करू असे आश्वासन दिले.तथापि, इराणने अद्याप नव्या चर्चेला अधिकृत मान्यता दिलेली नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सांगितले, "अमेरिकेसोबत दुसऱ्या फेरीतील चर्चेची सध्या कोणतीही योजना नाही आणि पुढील चर्चा कधी होईल हेही निश्चित झालेले नाही."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले, "जेरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ पश्चिम आशियाकडे रवाना होत आहेत. त्यांची बैठक मंगळवारी सकाळी सुरू होईल. हा अतिशय सोपा करार आहे आणि बहुतेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचे एकमत झाले आहे."

अमेरिका आणि इराण यांच्यात ८ एप्रिल रोजी झालेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविराम कराराची मुदत २२ एप्रिल रोजी संपणार आहे. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिल्या फेरीतील चर्चेत अनेक मुद्द्यांवर एकमत झाले नव्हते. इराण होर्मुझ सामुद्रधुनी आणि युरेनियम संवर्धनाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi