अमरावती, 05 मे (हिं.स.)। देशाचे नियोजन, विकासवकल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी जनगणना प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. पण या जनगणनेच्या नावाखाली सोशल मीडियावर काही बनावट ऑनलाइन अर्ज व लिंक फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
या प्रकरणी नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे सरकारने नागरिकांना अशा लिंक पासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी सरकारने दिलेल्या संकेतस्थळाशिवाय इतर कोणत्याही लिकवर माहिती भरू नये, असे आवाहन सरकारने केले आहे. देशाच्या विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या जनगणना उपक्रमाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.यंदा प्रथमच नागरिकांना स्व-गणना नोंदविण्यासाठी डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या प्रक्रीयेचा एक बोगस अर्ज व्हायरल झाला आहे.
सरकारने नागरिकांना या अर्जापासून दूर राहण्याचा सल्ला देत सरकारने निश्चित केलेले संकेतस्थळ व अँपद्वारेच आपली माहिती भरण्याचे आवाहन केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पोस्टद्वारे जनतेला जनगणना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
सरकारने स्व-गणना करण्यासाठी १ मे ते १५ मे हा कालावधी निश्चित केला आहे. या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने आपली व आपल्या कुटुंबाची माहिती भरता येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरयादी व घरगणना टप्पा पार पडणार आहे. या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास, पुढील प्रक्रिया गणनकांच्या प्रत्यक्ष गृहभेटीत अधिक सुलभव जलद पद्धतीने होईल. या पार्श्वभूमीवर सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाने नागरिकांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या बोगस अर्जापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
