Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाप्रसेत महिलांचे प्रतिनिधीत्व विक्रमी 41 टक्क्यांवर, समकालीन भारतातील संधींच्या लोकशाहीकरणाचे प्रतिबिंब : डॉ. जितेंद्र सिंह

भाप्रसेत महिलांचे प्रतिनिधीत्व विक्रमी 41 टक्क्यांवर, समकालीन भारतातील संधींच्या लोकशाहीकरणाचे प्रतिबिंब : डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 28 मे (हिं.स.) -

भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2024 च्या तुकडीत महिला अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व जवळपास 41 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, भारतीय प्रशासकीय सेवेच्या इतिहासातील हे सर्वाधिक महिला सहभागांपैकी एक आहे, असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले आहे.

देशातील नागरी सेवांचे बदलते स्वरूप देशात घडत असलेल्या व्यापक परिवर्तनाचे प्रतिबिंब आहे, असे देखील ते म्हणाले. पारंपरिक सामाजिक आणि प्रादेशिक मर्यादांपलीकडे संधींचा विस्तार होत असून, तरुण भारतीय आता आकांक्षा, तंत्रज्ञान आणि उत्तरदायित्व यांच्या आधारावर नवी प्रशासन संस्कृती घडवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीतील विनय मार्ग येथील सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2024 च्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. आज सेवेत प्रवेश करणारे अधिकारी इतिहासाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्यात कार्यरत होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारत 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा हे अधिकारी आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च नेतृत्वाच्या भूमिकेत असतील.

हा संवाद सहाय्यक सचिव कार्यक्रमाचा एक भाग होता. या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2024 च्या तुकडीतील 184 अधिकाऱ्यांची 4 मे ते 25 जून 2026 या आठ आठवड्यांच्या कालावधीसाठी केंद्र सरकारच्या 49 मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावरील धोरण निर्मिती, समन्वय व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सध्याच्या तुकडीतील 78 अधिकारी अभियांत्रिकी क्षेत्रातील असून, वैद्यकीय, विधी, व्यवस्थापन आणि मानवविद्या शाखांतील व्यावसायिकांचाही या तुकडीत समावेश आहे, असे सिंह यांनी सांगितले. प्रशासनाच्या स्वरूपात गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून, पारदर्शकता, तत्पर प्रतिसाद आणि नागरिकांच्या सहभागावर आता अधिक भर दिला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी मिशन कर्मयोगी सारख्या व्यासपीठांचा पूर्ण उपयोग करण्याचे डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रशासन, डेटा विश्लेषण आणि सार्वजनिक संवाद यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सातत्याने आपली क्षमता विकसित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत @2047 हा केवळ एक मैलाचा टप्पा म्हणून मर्यादित नसून ते राष्ट्रीय अभियान असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. येत्या दशकांमध्ये भारताच्या उदयामध्ये सध्याच्या पिढीतील अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे ते म्हणाले. नम्रता, शिस्त आणि राष्ट्रहिताची व्यापक भावना ठेवून लोक सेवा करण्याचे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi