Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भारताने पाकिस्तानच्या नजरेतून आम्हाला पाहू नये - तुर्की परराष्ट्रमंत्री

भारताने पाकिस्तानच्या नजरेतून आम्हाला पाहू नये - तुर्की परराष्ट्रमंत्री

सिंगापूर, 04 जून (हिं.स.)काश्मीरपासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर तुर्कीने पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत.

मात्र, तुर्कीच्या भूमिकेत विशेष बदल दिसत नसला तरी आता तो भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्कीने म्हटले आहे की, पाकिस्तानशी चांगले आणि बंधुत्वाचे संबंध असलेला तो एकमेव देश नाही; जगातील इतर अनेक देशांचेही पाकिस्तानसोबत असे संबंध आहेत.

सिंगापूर येथे आयोजित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज (आयआयएसएस) च्या कार्यक्रमात बुधवारी तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हकान फिदान यांनी भारताला आवाहन केले की, अंकारा आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांकडे पाकिस्तानच्या संदर्भातून पाहू नये. तसेच, त्यांनी पाकिस्तानसोबतच्या तुर्कीच्या संबंधांचे समर्थन करत काही मुद्देही मांडले. हकान फिदान यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी तुर्कीकडे पुरेशी कारणे असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले, "भारत आणि तुर्की यांच्यात कोणताही द्विपक्षीय वाद नाही. भारतासोबत आमचा कोणताही कटू इतिहास नाही." ते पुढे म्हणाले, "काही मुद्द्यांवर आमचे रशियाशी मतभेद आहेत, काही विषयांवर अमेरिकेशी तर काही युरोपीय देशांशीही मतभेद आहेत. मात्र, नकारात्मक मुद्दे बाजूला ठेवून सकारात्मक अजेंड्यावर पुढे जाता येते. माझ्या मते, तुर्की आणि भारत यांच्यातही असेच व्हायला हवे."

तुर्कीच्या परराष्ट्रमंत्र्यांची ही भूमिका अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ऑपरेशन सिंदूर दरम्यान अंकाराने पाकिस्तानला उघडपणे मदत केल्याची बाब सर्वश्रुत झाली आहे. तुर्कीने ऑपरेशन सिंदूरच्या काळात पाकिस्तानला आत्मघाती 'इहा' ड्रोनची मोठी खेप पुरवल्याचे सांगितले जाते. तसेच, संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर तुर्कीने पाकिस्तानप्रमाणेच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ उघडपणे भूमिका घेतल्यानंतर भारत-तुर्की संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. भारतीय अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी राजधानीत आयोजित तुर्कीच्या राष्ट्रीय दिन समारंभाला उपस्थिती लावली नव्हती, ज्यातून अंकाराबद्दलची नवी दिल्लीची नाराजी स्पष्ट झाली होती. मात्र, एप्रिल २०२६ मध्ये दोन्ही देशांदरम्यान १२वी परराष्ट्र कार्यालय सल्लामसलत बैठक (एफओसी) पार पडली, ज्यामुळे संबंध सुधारण्याच्या शक्यतेचे संकेत मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi