Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भिवंडी अपघातस्थळाची गिरीश महाजनांकडून पाहणी, मृतांचा आकडा 9 झाला

भिवंडी अपघातस्थळाची गिरीश महाजनांकडून पाहणी, मृतांचा आकडा 9 झाला

- मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

मुंबई, 31 जुलै (हिं.स.)। भिवंडी येथे घडलेल्या दुर्दैवी कोहिनूर इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली तसेच प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देत, प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले. शासनाच्या वतीने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखाची मदत यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे.तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्तीग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार इमारत कोसळून आत्तापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून 12 तासांच्या अथक प्रयत्नांती 9 व्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आलं आहे. 3 जण यात जखमी झाले आहेत. मात्र ढिगारा उपसण्याचे, तो बाजूला करण्याचे आणि आतमध्ये आणखी जे नागरिक अडकले असतील, त्यांना बाहेर काढण्याच बचावकार्य अद्यापही सुरू आहे.भिवंडी इमारत दुर्घटनेतील सात व्यक्तींचे मृतदेह सकाळी ९:३० पर्यंत आय.जी.एम हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. शमीम शेख वय 32 ; रंजीत सिंग वय 45 ; मिराज रसूल शेख वय 34; संतोष कुमार पांडे वय 42 ; शमीम अन्सारी वय 30 ; चार मृतदेहांची अजूनही ओळख पटलेली नाही.

दुर्घटनेतील मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना घटनेची माहिती दिली असून त्यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री यांनी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

आपत्तीच्या काळात प्रशासन, बचाव पथके आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी केले. सदर इमारतीच्या शेजारील इमारतीतील नागरिकांचे देखील स्थलांतर करण्यात आले असून त्यांची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनास दिले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, महापौर नारायण चौधरी, जिल्हाधिकारी श्रीकांत पांचाळ, यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन, महापालिका प्रशासन, तसेच सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देत दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.भिवंडीत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसंच जखमींवर उपचार केले जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी ईश्वरचरणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi