बीड, 01 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाड्यात विशेषतः बीड जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडला आहे. पावसाची अनिश्चितता, पिकांची झालेली हानी, पाणी टंचाई आदींचा अनिष्ट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीपुरती मर्यादित नसून याचा संपूर्ण ग्रामीण व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरीकांना या संकटातून दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने वस्तुनिष्ठ पाहणी करून 'कोरडा दुष्काळ' जाहिर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून गावा-गावांतून टँकरची मागणी सुरु झाली आहे, जलसाठे कोरडे पडत आहेत. जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे अधिक वाट न पाहता दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची मागणी आज लेखी पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे त्यामुळे या बाबत नक्कीच दिलासादायक निर्णय होईल याची मला खात्री आहे. असे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

