Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

बृहन्मुंबई क्षेत्रात मागील २४ तासांत सुमारे ७४ टक्के पावसाची नोंद

• मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक ३१६ मिलीमीटर पाऊस, मागील चार दिवसांत ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद

• समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत

मुंबई, 04 जुलै (हिं.स.) - बृहन्मुंबई क्षेत्रातील विविध भागांमध्‍ये मागील २४ तासांत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हे प्रमाण जुलै महिन्याच्या सरासरीच्या ७४ टक्के असून वार्षिक हंगामाच्या २५ टक्के इतके आहे. या कालावधीदरम्यान समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस सुरू असूनही मुंबईतील जनजीवन सुरळीत राहिले. सुमारे १० सखल भागांच्या ठिकाणी पाणी साचण्याची तसेच १८ झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तथापि, त्यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे १० हजार अधिकारी, कर्मचारी कार्यक्षेत्रांवर (ऑन ग्राऊंड) अविरतपणे कार्यरत आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

मुंबईत वर्षभरात सुमारे २३१८ मिलीमीटर पाऊस पडतो. तर, जुलै महिन्यात साधारणपणे ८०० मिलीमीटर इतका पाऊस होतो. तथापि, मागील चार दिवसांपासून बृहन्मुंबई क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत आहे. या चार दिवसांत मुंबईत सुमारे ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण ७४ टक्के इतके आहे. तर, दिनांक ३ ते ४ जुलै २०२६ या २४ तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक हंगामी पावसाच्या २५ टक्के आणि जुलै महिन्याच्या ४० टक्के इतके आहे. मागील २४ तासांत मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक ३१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही मागील वर्षातील सर्वोच्च नोंद आहे. तथापि, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी दुपारी २.५० वाजता समुद्राला ४.२६ मीटर उंचीची भरती होती. इतक्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस आणि समुद्राला भरती असूनदेखील बृहन्मुंबई क्षेत्रातील जनजीवन दिनांक ४ जुलै २०२६ रोजी सुरळीत होते. शहर आणि उपनगरांतील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

या कालावधीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मुंबईत झाडांच्या व फांद्यांच्या अनुषंगाने १०३ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १८ तक्रारी झाडे पडल्याच्या होत्या. एकूण १७ घरे व भिंती पडल्याच्या घटनांची देखील नोंद झाली होती. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे १० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून प्राप्त झाल्या. मात्र, संबंधित ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेळीच उपाययोजना करुन पाण्याचा निचरा केला. दरम्यान, भांडूप (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत खाजगी विकासकाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये खोदकामाचा भाग कोसळल्याची घटना घडली. सदर ठिकाणी महानगरपालिकेकडून बॅरिकेडींग करुन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi