Dailyhunt
चाकूरमध्ये एकाच व्यापाऱ्यावर दुहेरी वार; दुकानफोडीत १.६२ लाखांचा मुद्देमाल लंपास

चाकूरमध्ये एकाच व्यापाऱ्यावर दुहेरी वार; दुकानफोडीत १.६२ लाखांचा मुद्देमाल लंपास

लातूर, 5 मे, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात एकाच व्यापाऱ्याशी संबंधित दोन मोठ्या चोरीच्या घटनांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जुन्या बसस्थानक परिसरातील कल्पना इंजिनिअरिंग या दुकानाशी संबंधित आधी वाहन चोरीची घटना घडली होती.

तर आता त्याच दुकानावर थेट दुकानफोडी करून पुन्हा चोरी करण्यात आल्याने व्यापारी वर्गात तीव्र भीती व संताप व्यक्त होत आहे.

ताज्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील मोटारी, कॉपर वायर, केबल बायर, वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, स्टार्टर, बेंडर आदी साहित्य असा एकूण अंदाजे १,६२,००० किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी दुकानमालक संतोष नारायण साखरे (वय ४५, व्यवसाय मोटार मेकॅनिक) यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी घडलेल्या घटनेत, याच दुकानासमोर उभी असलेली चारचाकी गाडी चोरीस गेली होती. विशेष म्हणजे त्या वाहनामध्ये दुकानातीलच मोठ्या प्रमाणात साहित्य होते. त्या घटनेत लाखो रुपयांचा मुद्देमाल वाहनासह लंपास करण्यात आला होता. त्या प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या सलग घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हे रोखणे, या दोन्ही घटनांमुळे प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच व्यापाऱ्यावर वारंवार गुन्हे होत असताना पोलिसांचा प्रतिबंधात्मक यंत्रणा कुठे अपयशी ठरत आहे? या संदर्भात संबंधित व्यापाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi