Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चाकूरमध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा

चाकूरमध्ये इंधनाचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा

लातूर, 05 मे (हिं.स.)। चाकूर तालुक्यात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंधनाची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. इंधनासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र, पंपांवर कोणतेही नियोजन किंवा शिस्त नसल्याने अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाहनधारकांना इंधनासाठी तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या उन्हाळ्याची तीव्र लाट असून, पंपांवर पिण्याच्या पाण्याची आणि सावलीची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रांगेत पुढे जाण्यावरून वाहनधारकांमध्ये सातत्याने वादविवाद उफाळून येत आहेत. त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रवासी वाहने, वऱ्हाडी गाड्या आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, इंधनाअभावी या सर्वांची मोठी गैरसोय होत असून, अनेकांचा अर्धा दिवस केवळ इंधन मिळवण्यातच वाया जात आहे. प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा, तसेच पेट्रोल पंपांवर पिण्याचे पाणी, सावली आणि शिस्तबद्ध रांगांची व्यवस्था करावी, अशी आग्रही मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi