Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चांदवडजवळ परिवहन महामंडळाच्या धावत्या एसटी बसला आग; 54 प्रवासी बचावले

महामार्गावर नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न कायम

चांदवड, 02 जून (हिं.स.)। मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील चांदवड जवळ एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. शहादा येथून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या बसला अचानक भीषण आग लागली.

काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, चालक आणि वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व 54 प्रवासी सुखरूप बाहेर पडले असून मोठा अनर्थ टळू शकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादा नाशिक ही बस मालेगावहून नाशिककडे निघाली होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास चांदवड घाट उतरल्यानंतर चालत्या बसमधून अचानक धूर निघत असल्याचे चालक गोविंद पाटील आणि वाहक सचिन नन्नावरे यांच्या निदर्शनास आले. तेव्हा आता काहीतरी अघटीत घडू शकते, हा धोका ओळखून प्रसंगावधान राखत चालक पाटील यांनी बस रस्त्याच्या कडेला घेत थांबवली. बस थांबवताच चालक आणि वाहकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रवाशांना तात्काळ बसमधून उतरण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती, मात्र चालक व वाहक यांनी सर्वांना धीर देत अवघ्या काही मिनिटांत सर्व ४८ प्रवाशांना बसमधून सुरक्षितपणे बाहेर उतरविले. प्रवासी सुरक्षित अंतरावर पोहोचतात ना पोहोचतात, तोच आगीने भीषण स्वरूप धारण केले. आगीच्या ज्वालांनी संपूर्ण बसला कवेत घेतले.

आगीच्या या घटनेची माहिती मिळताच चांदवड नगरपरिषद अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत आगीची तीव्रता इतकी वाढली होती की, प्रवाशांच्या डोळ्यादेखत ही बस जळून खाक झाली. या आगीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे चालत्या बसला लागलेल्या आगीमुळे बस प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

प्राथमिक अंदाजानुसार बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची नोंद चांदवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच मनमाड बस आगाराचे प्रमुख विक्रम नागरे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. भररस्त्यात घडलेल्या या 'बर्निंग बस'च्या थरारानंतरही सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने प्रशासनाने आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi