Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा 'लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी' ॲपचे लोकार्पण

चंद्रपूर, 30 जुलै (हिं.स.)। जैवविविधता संवर्धन आणि नागरिक विज्ञान (सिटीझन सायन्स) क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने विकसित केलेल्या (LepiScan ) 'लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी' या अभिनव मोबाईल ॲपचे लोकार्पण आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वनविभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व वनबल प्रमुख श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी तसेच वन विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

लेपीस्कॅन-बटरफ्लाय आयडी हे फुलपाखरांच्या प्रजातींची जलद आणि अचूक ओळख करून देणारे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित मोबाईल ॲप आहे. विशेष बाब म्हणजे हे ॲप ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इन-हाऊस विकासकांच्या चमूने पूर्णपणे विकसित केले आहे. देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाने अशा प्रकारचे ॲप विकसित करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न आहे. पक्षी आणि इतर काही वन्यजीवांच्या ऑफलाइन ओळखीसाठी ॲप उपलब्ध असले तरी फुलपाखरांच्या ओळखीसाठी समर्पित ऑफलाइन ॲपची कमतरता होती.

निसर्गप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेले हे ॲप फुलपाखरांविषयीचे अध्ययन अधिक सुलभ, आकर्षक आणि परस्परसंवादी करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. या ॲपचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पूर्णपणे ऑफलाइन कार्यक्षमता. मोबाईलमधील मशीन लर्निंग मॉडेलच्या साहाय्याने मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसलेल्या दुर्गम वनक्षेत्रातही फुलपाखरांच्या प्रजातींची अचूक ओळख करता येते.

---

लेपीस्कॅन ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये-

- १,००० हून अधिक प्रजातींचा विस्तृत डेटाबेस : भारतात आढळणाऱ्या १ हजारांहून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींचा सर्वसमावेशक डेटाबेस या ॲपमध्ये उपलब्ध असून दुर्मिळ प्रजातींचीही ओळख करणे शक्य होते.

- त्वरित ऑफलाइन ओळख : प्रगत मशीन लर्निंग मॉडेलच्या साहाय्याने कॅमेऱ्याने काढलेले छायाचित्र किंवा गॅलरीतील प्रतिमा इंटरनेटशिवाय त्वरित विश्लेषित करून फुलपाखराची प्रजाती ओळखली जाते.

- जैवविविधता संवर्धनावर भर : नागरिक विज्ञानाचे प्रभावी साधन म्हणून हे ॲप फुलपाखरांविषयी महत्त्वपूर्ण अनुभवजन्य माहिती संकलित करण्यास मदत करेल. त्यामुळे वन अधिकारी आणि संशोधकांना अधिक प्रभावी संवर्धन धोरणे तयार करण्यास सहाय्य मिळेल.

- अपरिचित फुलपाखरांची नोंद : या ॲपमध्ये Report Unidentified Butterfly हे वैशिष्ट्य उपलब्ध असून त्याद्वारे वापरकर्ते अपरिचित अथवा संभाव्य नवीन फुलपाखरांच्या प्रजातींची माहिती व छायाचित्रे ॲपमधील Google Form च्या माध्यमातून पाठवू शकतात. तसेच ॲपमध्ये अद्याप समाविष्ट नसलेल्या प्रजातींचीही नोंद करता येते, ज्यामुळे फुलपाखरांचा डेटाबेस सातत्याने अद्ययावत आणि अधिक व्यापक होत राहील.

- विनामूल्य उपलब्ध : हे ॲप Google Play Store वर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.

- संकेतस्थळावरही सुविधा उपलब्ध : फुलपाखरांची ओळख (Butterfly ID) सुविधा ताडोबाच्या अधिकृत संकेतस्थळावरील Citizen Science विभागातही उपलब्ध असून त्यासाठी https://mytadoba.mahaforest.gov.in/butterfly-id/ या लिंकचा वापर करता येईल.

- नागरिक विज्ञानासाठी प्रोत्साहन : भारतात आढळणाऱ्या अधिकाधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद वाढावी यासाठी या ॲपद्वारे २५ अतिरिक्त फुलपाखरांच्या नोंदी करणाऱ्या वापरकर्त्यांना एक मोफत जंगल सफारी देण्यात येणार आहे.

हे ॲप वापरकर्त्यासाठी अत्यंत सुलभ असून कठोर गोपनीयता निकषांचे पालन करून विकसित करण्यात आले आहे. वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते आणि त्यांच्या भौगोलिक हालचालींचा कोणताही मागोवा घेतला जात नाही. वन विभागाने निसर्ग मार्गदर्शक, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांना दैनंदिन जीवनात तसेच निसर्गभ्रमंतीदरम्यान लेपीस्कॅनचा वापर करण्याचे आवाहन केले असून, त्याद्वारे परिसरातील फुलपाखरांच्या प्रजातींचे अध्ययन, दस्तऐवजीकरण आणि दीर्घकालीन संवर्धनात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी अथवा चौकशीसाठी संपर्क : ccffdtatr@gmail.com

----

आज अधिकाधिक पर्यटक आणि हौशी निसर्ग अभ्यासक वाघाव्यतिरिक्त इतर वन्यजीव प्रजातींबद्दलही उत्सुकता दाखवत आहेत. मात्र, मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसलेल्या वनक्षेत्रात फुलपाखरे आणि इतर प्रजातींची ओळख पटविणे ही मोठी अडचण ठरत होती. आमच्या इन-हाऊस विकासकांच्या चमूने विकसित केलेले हे ॲप एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दुर्गम वनक्षेत्रातही फुलपाखरांची ओळख सहज शक्य करून हे ॲप जैवविविधतेच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी मोठे योगदान देईल.

प्रभू नाथ शुक्ला,

क्षेत्र संचालक,

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi