Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

चंद्रपूरमध्ये निवडणूक निरीक्षकांकडून आढावा बैठक; निवडणूक यंत्रणेला कडक सूचना

चंद्रपूर, 2 जून (हिं.स.) : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रणासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक स्वाती म्हसे पाटील यांनी मंगळवारी चंद्रपूरमध्ये निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

या वेळी स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतली आणि निवडणूक प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने व काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या. मतदान साहित्याचे वाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच चंद्रपूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्र आणि मतमोजणी कक्षाची पाहणीही त्यांनी केली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देताना सांगितले की, या मतदारसंघात एकूण 975 मतदार असून त्यामध्ये 495 पुरुष आणि 480 महिला मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या तिन्ही जिल्ह्यांतील नगरपालिका व नगरपंचायती मिळून एकूण 17 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतमोजणी चंद्रपूर येथील तहसील कार्यालयात होणार आहे.

निवडणूक प्रक्रियेबाबत निरीक्षक स्वाती म्हसे पाटील चंद्रपूर येथील वन अकादमीतील बकुळ व्हीआयपी गेस्ट हाऊस येथे सकाळी 11 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 6 या वेळेत उपलब्ध राहणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांचे दौरे तीन टप्प्यांत होणार असून नामांकन प्रक्रियेपासून निकाल जाहीर होईपर्यंत त्या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi