जळगाव, 30 जुलै (हिं.स.) खान्देशातील विशेष गाडी म्हणून सुरू असलेली दादर-भुसावळ एक्सप्रेस आता कायमस्वरूपी रेल्वे सेवेत समाविष्ट करण्यात आली असून, १ ऑगस्ट २०२६ पासून ही गाडी 19003/19004 'खान्देश एक्सप्रेस' या नवीन क्रमांकाने आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.
या निर्णयामुळे मुंबई आणि खान्देश दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कायमस्वरूपी गाडी सुरू झाल्यामुळे रेल्वे तिकिटांच्या दरात सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत बचत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक लाभासह अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध होणार आहे.'खान्देश एक्सप्रेस' दादर, पालघर, वापी, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांना जोडणार असल्याने खान्देशातील प्रवाशांच्या प्रवासाला मोठी गती मिळणार आहे. व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार आणि मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा विशेष लाभदायक ठरणार आहे. या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खान्देशवासीयांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच या गाडीला कायमस्वरूपी मंजुरी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) तसेच संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल खान्देश प्रवासी असोसिएशनने त्यांचेही आभार मानले आहेत. पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसी सदस्य तथा खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगावचे प्रतिनिधी प्रतीक जैन यांनी सांगितले की, "खान्देशच्या रेल्वे विकासाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
