Dailyhunt
डेमोक्रॅट नेत्यांची ट्रम्प प्रशासनाकडे तात्काळ युद्धविरामाची मागणी

डेमोक्रॅट नेत्यांची ट्रम्प प्रशासनाकडे तात्काळ युद्धविरामाची मागणी

वॉशिंग्टन , 02 एप्रिल (हिं.स.)।अमेरिकेत इराण युद्धाच्या मुद्द्यावर राजकारण तापले असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रणनीतीवर जोरदार टीका करत तात्काळ युद्धविरामाची मागणी केली आहे.

अमेरिकन संसदेतल्या परराष्ट्र व्यवहार समितीतील वरिष्ठ डेमोक्रॅट नेत्यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका करत म्हटले की, एक महिन्याहून अधिक काळ उलटल्यानंतरही युद्धाचे कोणतेही स्पष्ट परिणाम दिसून आलेले नाहीत. संयुक्त निवेदनात त्यांनी आरोप केला की,ट्रम्प यांनी ठोस योजना नसताना युद्ध सुरू केले आणि आतापर्यंत ठरवलेली उद्दिष्टे साध्य करण्यात अपयश आले आहे.

डेमोक्रॅट नेत्यांच्या मते, या युद्धामुळे इराणच्या अणुकार्यक्रमावर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही, तसेच त्याच्या क्षेपणास्त्र क्षमतेत किंवा दहशतवादी संघटनांना दिल्या जाणाऱ्या समर्थनातही बदल झालेला नाही. त्यांनी असेही म्हटले की, या संघर्षामुळे इराणच्या सामान्य नागरिकांनाही कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार,ट्रम्प प्रशासनाला अद्याप कोणतेही ठोस धोरणात्मक यश मिळालेले नाही.

डेमोक्रॅट खासदारांनी सांगितले की, या युद्धाची किंमत खूप मोठी ठरली आहे. आतापर्यंत 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. याशिवाय अब्जावधी डॉलर किमतीची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे नष्ट झाली आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, हजारो इराणी नागरिकांचाही या संघर्षात मृत्यू झाला असून त्यामध्ये 150 हून अधिक शालेय मुलींचा समावेश आहे. तसेच या युद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. तेल, खत आणि हीलियमसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून मध्यपूर्वेत तणाव अधिक वाढला आहे.

डेमोक्रॅट नेत्यांनी आरोप केला की,ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकेचे अनेक पारंपरिक सहयोगी देश नाराज झाले असून या युद्धात साथ देण्यापासून दूर राहत आहेत.ट्रम्प यांनी सहयोगी देशांशी अयोग्य वर्तन केल्यामुळे अमेरिकेची जागतिक प्रतिमा कमकुवत झाली असल्याचे त्यांनी म्हटले.डेमोक्रॅट नेत्यांनी राष्ट्राध्यक्षांना तात्काळ इराणसोबत युद्धविरामासाठी चर्चा सुरू करण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, युद्ध समाप्त करण्याचा हा एकमेव मार्ग असून अन्यथा हा संघर्ष दीर्घकाळ चालणारा आणि अधिक नुकसानकारक ठरू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi