Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, आरसी बुक बघून इंधन देण्यात येत आहे - वडेट्टीवार

देशात लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण होऊ शकते, आरसी बुक बघून इंधन देण्यात येत आहे - वडेट्टीवार

Hindusthan Samachar 4 months ago

नागपूर, 28 मे (हिं.स.) - देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने होरपळत असताना भाजप सरकार मात्र धार्मिक ध्रुवीकरण, इव्हेंटबाजी आणि भावनिक मुद्द्यांच्या आड आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

इंधन तुटवडा आणि वाढत्या दरांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवत वडेट्टीवार म्हणाले, वाहनाचे आरसी बुक बघू डिझेल दिले जात आहे. शेतकरी आता शेतीच्या कामासाठी डिझेल वापरतात ना? देशातील स्थिती येत्या काही दिवसात लॉकडाऊन सारखी होऊ शकते. पुढील काही दिवसात पेट्रोल १७० रुपये आणि डिझेल १५० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे भरडले जातील. आताच विमानांच्या फेऱ्या कमी होत आहेत, इंधनाचा तुटवडा वाढत आहे. सरकारने देशाला आर्थिक खड्ड्यात ढकलण्याचे काम सुरू केले आहे,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

भाजपचे संपूर्ण राजकारण जनतेच्या याच मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या या गंभीर मुद्द्यांवर बोलण्याऐवजी सत्ताधारी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात तेढ पसरवत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारकडे एकीकडे संविधानाची भाषा करतात पण प्रत्यक्षात समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. मंत्री आपल्या शपथेचा विसर पडल्यासारखे असंवेदनशील विधान करत आहेत. जनतेचे लक्ष आर्थिक संकटावरून हटवण्यासाठी सरकार धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधताना वडेट्टीवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत, पण सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहे. जीआर काढले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi