बीड, 05 मे (हिं.स.)। धारूर तालुक्यातील घाटपाटी परिसरात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणाऱ्या पाच तरुणांनी पोलीस उपनिरीक्षकासह त्यांच्या पथकावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या हल्ल्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या छातीला दगड लागून ते जखमी झाले असून पोलिसांनी यातील दोन आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब किशन भवर यांनी फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक भवर हे आपल्या पथकासह गस्त घालत असताना त्यांना घाटपाटी येथील हॉटेल सुरू असल्याचे आणि तिथे काही तरुण गोंधळ घालत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना हॉटेल बंद करून तिथून निघून जाण्याच्या सूचना दिल्या असता पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यातील आरोपी याने आपण पोलीस असल्याचे सांगत उपनिरीक्षक भवर यांना अंगावर धावून येत धक्काबुक्की केली आणि त्यांचा गळा धरून ओढाताण केली. पोलिसांनी जादा कुमक मागवली असता आरोपींनी अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या दिशेने बेछूट दगडफेक सुरू केली. यामध्ये एक दगड थेट उपनिरीक्षक भवर यांच्या छातीला लागला. दगडफेक सुरू असतानाच दुचाकीवरून फरार झाले, तर दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
धारूर पोलीस ठाण्यात या पाचही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis
