Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

डीएपी ऐवजी पर्यायी खत वापरावे, कृषी विभागाचे आवाहन

रभणी, 2 जून (हिं.स.) : सध्याच्या आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात डीएपी खताच्या मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. डीएपी खताची किंमत 1350 रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी डीएपीऐवजी पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) मध्ये 16 टक्के स्फुरद, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध असतात. त्यामुळे डीएपीच्या एका गोणीऐवजी SSPच्या सुमारे तीन गोण्या आणि अर्धी गोणी युरिया वापरणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

युरिया मध्ये 46 टक्के नायट्रोजन असल्याने पिकांची वाढ सुधारते. तसेच ट्रिपल सुपर फॉस्फेट (TSP) मध्ये 46 टक्के फॉस्फरस असल्यामुळे मुळांची वाढ, फुलधारणा आणि उत्पादन वाढण्यास मदत होते.

सल्फरमुळे प्रथिन निर्मिती, तेल घटक पिकांचे उत्पादन आणि जमिनीची गुणवत्ता सुधारते, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

एनपीके खत (10:26:26, 20:20:0:13, 12:32:16, 15:15:15) यांसारख्या संयुक्त खतांमुळे नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्ही अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा होतो. त्यामुळे पिकांच्या पोषणासाठी हे खत अधिक उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचा वापर फवारणी किंवा ठिबक सिंचनाद्वारे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच कृषी विभागाने विकसित केलेल्या एआयपी ॲपचा वापर करून योग्य मार्गदर्शन घेण्याचेही सांगण्यात आले आहे.

रासायनिक खतांचा वापर कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आणि माती आरोग्य पत्रिकेनुसार संतुलित पद्धतीने करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. चव्हाण यांनी केले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi