Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

एआयसीटीई मान्यताप्राप्त बांबु टेक्नॉलॉजी डिप्लोमाकरीता चंद्रपुरातील बीआरटीसीला मंजुरी

चंद्रपूर, 30 मे (हिं.स.)। शाश्वत विकास, हरित उद्योग आणि बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने ऐतिहासिक झेप घेतली असून चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) ला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तीन वर्षीय 'डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी' अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.

या मान्यतेमुळे बीआरटीसी हे भारतातील बांबू टेक्नॉलॉजी विषयातील स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी एआयसीटीई मान्यता मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई संलग्न या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. ही मान्यता महाराष्ट्रातील बांबू उद्योग, हरित तंत्रज्ञान, शाश्वत रोजगार आणि ग्रामीण औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बीआरटीसीमध्ये 2017 पासून राज्य मान्यताप्राप्त बांबू टेक्नॉलॉजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू असून आता एआयसीटीई मान्यता मिळाल्यामुळे या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे बांबू क्षेत्रातील तांत्रिक शिक्षणाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना बांबू प्रक्रिया तंत्रज्ञान, ट्रीटमेंट, फर्निचर निर्मिती, बांबू बांधकाम तंत्रज्ञान, हस्तकला, नर्सरी व्यवस्थापन, उत्पादन डिझाईन, उद्योजकता विकास आणि उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. बीआरटीसीमधील अत्याधुनिक कार्यशाळा, ट्रीटमेंट प्लांट, यंत्रसामग्री, संशोधन सुविधा आणि क्षेत्रीय प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय बांबू अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या नवीन बांबू धोरणामुळे देशात बांबू आधारित उद्योगांना चालना मिळत असून प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

बीआरटीसीचे संचालक मनोजकुमार खैरनार म्हणाले, एआयसीटीई कडून प्राप्त झालेली ही मान्यता बीआरटीसी, चंद्रपूर आणि संपूर्ण बांबू क्षेत्रासाठी अभिमानास्पद उपलब्धी आहे. शाश्वत विकास, हरित उद्योग, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रात बांबूचे महत्त्व वाढत असून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कुशल तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया डीटीई/सीएपी च्या माध्यमातून होणार असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व भोजन सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुकांनी बीआरटीसी, चिचपल्ली, चंद्रपूर येथे तसेच https://brtc.org.in किंवा 95527 29996 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे बांबु संशोधन प्रशिक्षण संस्थेने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi