मुंबई, 05 मे (हिं.स.) : भारतातील अग्रगण्य मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ऍक्सिस म्युच्युअल फंड ने 'ऍक्सिस निफ्टी कॅपिटल मार्केट्स इंडेक्स फंड' या नव्या गुंतवणूक योजनेची घोषणा केली आहे.
हा ओपन-एंडेड इंडेक्स फंड असून तो निफ्टी कॅपिटल मार्केट ट्रायचे अनुकरण करणार आहे. भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या भांडवली बाजार व्यवस्थेत गुंतवणूक करण्याची संधी हा फंड गुंतवणूकदारांना देतो.
या योजनेचा नवीन फंड ऑफर (एनएफओ) कालावधी 4 मे 2026 ते 15 मे 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. किमान 100 रुपयांपासून पासून गुंतवणूक करता येणार असून त्यानंतर ₹1 च्या पटीत गुंतवणूक वाढवता येईल. युनिट वाटपानंतर 15 दिवसांच्या आत पैसे काढल्यास 0.25% एक्झिट लोड आकारला जाईल, त्यानंतर कोणतेही शुल्क लागणार नाही. या फंडाचे व्यवस्थापन नंदिक मलिक आणि रोहित गौतम करणार आहेत.गेल्या काही वर्षांत भारताच्या भांडवली बाजारात मोठे संरचनात्मक बदल झाले आहेत. वाढते डिजिटलीकरण, मजबूत देशांतर्गत गुंतवणूक आणि बचतीचे वित्तीयकरण यामुळे बाजार अधिक व्यापक आणि सशक्त झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत असून डीमॅट खात्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे देशभरातील गुंतवणूक अधिक सुलभ झाली आहे.
मार्च 2026 पर्यंत भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) सुमारे 79 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तरीही, जीडीपीच्या तुलनेत हे प्रमाण 20 टक्क्यांपेक्षा कमी असल्याने भविष्यात मोठ्या वाढीची संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.निफ्टी कॅपिटल मार्केट्स इंडेक्समध्ये एक्सचेंज, ब्रोकरेज कंपन्या, मालमत्ता व्यवस्थापन संस्था आणि डिपॉझिटरीज यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. हा इंडेक्स फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनवर आधारित असून सहा महिन्यांनी त्याचे पुनर्संतुलन केले जाते.
या फंडाच्या लॉन्चवेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. गोपकुमार यांनी सांगितले की, "भारतातील भांडवली बाजार अधिक व्यापक आणि सहभागी बनत आहे. या वाढीचा लाभ गुंतवणूकदारांना मिळावा यासाठी आम्ही हा फंड सादर करत आहोत."
एकूणच, कमी खर्च, पारदर्शक रचना आणि नियमाधारित गुंतवणूक पद्धतीमुळे हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

