नवी दिल्ली , 01 सप्टेंबर (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग यांच्यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही अत्यंत आत्मीयतेने भेट घेतली.
या भेटीचा एक रंजक व्हिडिओही समोर आला आहे.
पंतप्रधान मोदी आणि पुतिन-जिनपिंग यांची ही भेट होत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ काही अंतरावर उभे राहून हे संपूर्ण दृश्य पाहत होते. वास्तविक, एससीओ शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सर्व सदस्य देशांच्या नेत्यांचे एकत्रित फोटोसेशन झाले. यावेळी पुतिन आणि जिनपिंग सभागृहात पंतप्रधान मोदी यांच्या दिशेने आले आणि त्यांनी मोदी यांच्याशी अत्यंत आत्मीयतेने हस्तांदोलन केले. या तिन्ही नेत्यांमधील हा संवाद शहबाज शरीफही पाहत होते. मात्र, पंतप्रधान मोदी आणि शहबाज शरीफ यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही.आता या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी एससीओच्या व्यासपीठावरून दहशतवादाविरोधात एकजुटीचे आवाहन केले. ते म्हणाले, "दहशतवाद आजही संपूर्ण मानवतेसमोरील गंभीर आव्हान बनून राहिला आहे. त्याविरोधातील लढाईत आपण केवळ 'अॅक्शन-रिअॅक्शन'च्या विचारापुरते मर्यादित राहू शकत नाही. दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण व्यवस्थेचा नायनाट करणे आवश्यक आहे."
पंतप्रधान मोदी म्हणाले, "शांततापूर्ण आणि सुरक्षित युरेशियाची आपली सामायिक आकांक्षा अफगाणिस्तानातील शांतता आणि स्थैर्याशीही जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानच्या जनतेच्या विकासासाठी तसेच मानवतावादी मदतीसाठी योगदान देत आला आहे आणि पुढेही देत राहील."
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

