Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

गणेश पाटीलच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण; अडीच महिन्यांनंतर मृतदेह जमिनीतून बाहेर काढला

फॉरेन्सिक तपासासाठी सांगाडा धुळे येथे पाठवला

शवविच्छेदन अहवालाकडे जिल्ह्याचे लक्ष

ळगाव, 2 जून (हि.स.) : धरणगाव तालुक्यातील रेल गावातील 12 वर्षीय गणेश नवल पाटील यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे.

मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त होत असल्याने पोलिसांनी तपासाला नव्याने गती दिली असून, अडीच महिन्यांपूर्वी पुरण्यात आलेला गणेशचा मृतदेह सोमवारी प्रशासनाच्या उपस्थितीत जमिनीतून बाहेर काढण्यात आला.

गणेश पाटील याचा 15 मार्च रोजी क्रिकेट खेळत असताना मृत्यू झाला होता. मात्र हा मृत्यू नैसर्गिक नसून जुन्या वादातून एका मित्राने छातीत क्रिकेट बॅट मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप गणेशचे वडील नवल पाटील यांनी केला आहे.

या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी नवल पाटील यांनी गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ स्थानिक पोलीस ठाण्यापासून ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनंतर तपास यंत्रणांनी प्रकरणाची नव्याने दखल घेतली.

प्रशासनाच्या उपस्थितीत उत्खनन

फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, पोलीस अधिकारी आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत रेल गावाजवळील नदीकाठी पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण कार्यवाही प्रशासनाच्या देखरेखीखाली करण्यात आली.

मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर पुढील वैद्यकीय आणि वैज्ञानिक तपासणीसाठी सांगाडा धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हृदयद्रावक क्षण

उत्खननादरम्यान आपल्या एकुलत्या एक मुलाचा सांगाडा पाहून गणेशचे वडील नवल पाटील यांना अश्रू अनावर झाल्याचे भावनिक दृश्य उपस्थितांना पाहायला मिळाले. या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फॉरेन्सिक अहवालावर तपासाची दिशा अवलंबून

आता शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालातून गणेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे घातपात होता, याबाबतचा उलगडा अहवालानंतर होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू ठेवला असून फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi