Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गेल्या बारा वर्षांतील तंत्रज्ञान विषयक परिवर्तनातून रचला 2047 च्या विकसित भारताचा पाया - डॉ.जितेंद्र सिंह

गेल्या बारा वर्षांतील तंत्रज्ञान विषयक परिवर्तनातून रचला 2047 च्या विकसित भारताचा पाया - डॉ.जितेंद्र सिंह

वी दिल्ली, 31 मे (हिं.स.) : गेल्या 12 वर्षांत देशात झालेल्या तंत्रज्ञानविषयक परिवर्तनामुळे 2047 च्या विकसित भारताचा पाया रचला गेला, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, भारत तंत्रज्ञानाचे केवळ अनुकरण करणारा देश न रहाता तंत्रज्ञानातील अग्रणी नेतृत्व बनला आहे. या परिवर्तनामुळे जागतिक वैज्ञानिक पटलावरच्या भारताच्या स्थानात मूलभूत बदल झाल्याचेही सिंह नमूद केले.

दूरदर्शन न्यूज सोबतच्या विशेष पॉडकास्टदरम्यान, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, दशकांपासून भारत इतरत्र विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आला आहे; अनेकदा आघा़डीच्या राष्ट्रांच्या तुलनेत बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर भारत नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करता झाला. ते म्हणाले की, आज भारत जागतिक स्तरावरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये अधिकाधिक सक्रियपणे सहभाग घेत आहे आणि अनेक क्षेत्रांमध्ये खुद्द नवोन्मेषाच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्यासही मदत करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या बारा वर्षांत भारताने तंत्रज्ञान अनुयायी ते तंत्रज्ञान नेतृत्व हे स्थित्यंतर अनुभवले आहे. या काळात वैज्ञानिक क्षमता, नवोन्मेषाला पोषक वातावरण आणि तंत्रज्ञानविषयक पायाभूत सुविधा यांच्यामुळे विकसित भारत @2047 चा पाया रचला गेला आहे. असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला राष्ट्रीय धोरण निर्मितीच्या केंद्रस्थानी आणले, तसेच खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यास प्रोत्साहन दिले, नवोन्मेषावर आधारित उद्योजकतेला चालना दिली आणि वैज्ञानिक प्रगतीचे रूपांतर नागरिकांच्या मिळणाऱ्या प्रत्यक्ष लाभांमध्ये होईल याची खात्री केली. या दृष्टीकोनामुळे, भारताला तंत्रज्ञानआधारित परिसंस्था उभारणे शक्य झाले, ज्यामुळे आर्थिक विकास, धोरणात्मक क्षमता आणि सार्वजनिक सेवांचे वितरण या तिन्ही बाबींना एकाच वेळी बळ मिळाले.

भारताने, अंतराळ, अणू उर्जा, क्वाटंम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वच्छ उर्जा या क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. ही क्षेत्रे एकत्रितपणे विकसित भारत 2047 साठी आवश्यक असणारा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाचा पाया निर्माण करत आहेत, असेही जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.

अंतराळ क्षेत्राविषयी बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, हे क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले केल्यानंतर भारताने जगातील सर्वात गतिमान अंतराळ व्यवस्थेपैकी एक व्यवस्था विकसित केली आहे. अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सची संख्या एक अंकी संख्येवरून वाढून 400 पेक्षा जास्त झाली आहे, तर भारताची अंतराळ अर्थव्यवस्था, जी सध्या अंदाजे 9 अब्ज डाॅलर्स आहे, ती येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याचा अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या अंतराळ मोहिमांच्या यशामुळे विज्ञान हा केवळ शास्त्रज्ञांचा विषय न राहता सामान्य लोकांच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय बनला आहे आणि नवसंशोधक तसेच उद्योजकांच्या नवीन पिढीला प्रेरित केले आहे, असे मत, डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. आज अंतराळ तंत्रज्ञान, दळणवळण, पायाभूत सुविधांचे नियोजन, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, शेती आणि राष्ट्रीय सुरक्षा यासाठी साहाय्यक ठरत असून, ते दैनंदिन जीवनाशी अधिकाधिक सुसंगत बनत चालले आहे, असे डॉ. सिंह म्हणाले.

मंत्र्यांनी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिऍक्टर च्या प्रगतीचे वर्णन भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा धोरणातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड म्हणून केले. हे यश डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या संकल्पातील त्रि-स्तरीय अणु कार्यक्रमाला पुढे नेत आणि ऊर्जा सुरक्षा तसेच स्वावलंबनाच्या दिशेने भारताचा मार्ग बळकट करणारे आहे.

जैवतंत्रज्ञानाबद्दल बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत 'BioE3 Policy' च्या माध्यमातून बायोटेक्नॉलॉजीवर आधारित औद्योगिक परिवर्तनासाठी स्वतःला तयार करत आहे. भविष्यातील अर्थव्यवस्था वाढत्या प्रमाणात जैवतंत्रज्ञान, जेनेटिक्स आणि जैव-उत्पादनातील प्रगतीने आकाराला येईल आणि या क्षेत्रांमध्ये आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्रिय पावले उचलत आहे, असे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा उल्लेख करताना मंत्री म्हणाले की, 'एआय' हे प्रशासन, आरोग्यसेवा, कृषी, दळणवळण, वैज्ञानिक संशोधन आणि सार्वजनिक सेवा वितरणासह सर्वच क्षेत्रांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास येत आहे. कार्यक्षमता, नवोन्मेष आणि नागरिक-केंद्री प्रशासनात सुधारणा करण्यासाठी मानवी कौशल्य आणि 'एआय' सक्षम प्रणाली यांचा मेळ घालणारा एक संतुलित दृष्टिकोन भारत अवलंबत आहे, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छ ऊर्जेचा संदर्भ देत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारत अणुऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, सौर ऊर्जा आणि उदयोन्मुख महासागर-आधारित ऊर्जा प्रणालींचा समावेश असलेले एक वैविध्यपूर्ण धोरण राबवत आहे. हे उपक्रम देशाच्या शाश्वत विकासाच्या आणि 2070 पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाच्या दीर्घकालीन वचनबद्धतेशी सुसंगत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पॉडकास्टच्या शेवटी, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, गेल्या बारा वर्षांच्या प्रवासाकडे एका मोठ्या राष्ट्रीय परिवर्तनाची सुरुवात म्हणून पाहिले पाहिजे. या काळात निर्माण झालेला वैज्ञानिक आत्मविश्वास, तांत्रिक क्षमता आणि नवोपक्रम परिसंस्थेने, भारताला एक अग्रगण्य ज्ञान अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्यासाठी आणि 'विकसित भारत @2047' चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मजबूत स्थितीत आणले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi