Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोदरेज फाऊंडेशनकडून टुमारो मेकर्स उपक्रमाचा शुभारंभ

गोदरेज फाऊंडेशनकडून टुमारो मेकर्स उपक्रमाचा शुभारंभ

मुंबई, 28 मे (हिं.स.)।

गोदरेज फाऊंडेशन या स्वतंत्र सेवाभावी संस्थेने 'टुमारो मेकर्स' उपक्रम सुरु करण्याची घोषणा केली आहे. हा एक राष्ट्रीय स्तरावरील मोठा मंच आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या मंचाच्या माध्यमातून अफाट क्षमता असलेल्या हुशार विद्यार्थ्यांचा मागोवा घेतला जाईल. या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल.

भारतात हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांची कमतरता नाही. परंतु या सर्वांनाच प्रगतीच्या समान संधी उपलब्ध होत नाहीत. हा मुद्दा ध्यानात घेत टुमारो मेकर्स हा उपक्रम आकार घेतो. या उपक्रमाच्या माध्यमातून ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना आणि पदवीधरांपैकी अफाट क्षमता असलेल्या हुशार मुलांचा शोध घेतला जाईल. या विद्यार्थ्यांना विविध संस्था, अनुभवी मार्गदर्शक, स्पर्धा आणि इतर विद्यार्थी समूहांशी जोडले जाईल. या जोडणीमुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल. परिणामी, त्यांना आपल्यातील सुप्त गुणांचा विकास साधण्याची योग्य संधी मिळेल.

'टुमारो मेकर्स' हा उपक्रम आठ भागीदार संस्थांच्या माध्यमातून चालवला जाईल. या अंतर्गत वेगवेगळ्या वयोगटातील हुशार विद्यार्थ्यांसाठी चार विशेष मार्ग उपलब्ध केले जाईल. यामध्ये स्टेम, संशोधन व निर्मिती, कला आणि संरक्षण क्षेत्र यांचा प्रामुख्याने समावेश असेल. विद्यार्थी आपल्या आवडीचे कोणतेही क्षेत्र निवडू शकतात. या चारही क्षेत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचा विकास करण्याची संधी मिळेल.

याप्रसंगी गोदरेज फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमर मोमीन म्हणाले की, "भारतात जगभरातील सर्वात मोठी शालेय विद्यार्थ्यांची संख्या आढळून येते. मात्र गरीब आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना अजूनही योग्य मार्गदर्शन, प्रगत शिक्षणाच्या संधी आणि कौशल्य विकासाची व्यासपीठे ही सम प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. 'टूमारो मेकर्स'च्या माध्यमातून ही दरी दूर सारणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांतील आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या हुशार तरुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य दिशा देणार आहोत. या व्यासपीठामुळे देशात भविष्यातील संशोधक, उद्योजक, कलाकार, सैनिक तसेच आदर्श नेते तयार होतील, असा आम्हांला विश्वास आहे. या विद्यार्थ्यांचे यश त्यांच्या कुटुंबाचा कायापालट करेल. समाजाचे बळकटीकरण होईल. परिणामी, भारताच्या दीर्घकालीन विकासात आणि नेतृत्वात मोठे योगदान दिले जाईल."

विज्ञान आणि गणित विषयांची आवड असलेल्या १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी टुमारो मेकर्स खास विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांना दक्षिणा, अवंती फेलोज या भागीदार संस्थांद्वारे जेईई आणि नीट परीक्षांसाठी मोफत कोचिंग दिले जाईल. ६ वी आणि ७वीच्या लहान मुलांसाठी जेनवाईज आणि मेकरघाट या संस्था समर कॅम्प आणि कार्यशाळा आयोजित करतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कॉम्प्युटिंग आणि गणित आदी विषयांचे उच्च स्तरावरील शिक्षण दिले जाईल. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधीदेखील उपलब्ध होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi