सर क्रीकच्या दलदलीच्या भागातून भारतीय जलक्षेत्रात केला प्रवेश
बीएसएफकडून पाकिस्तानी मासेमारीची नौकाही जप्त
कच्छ, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : भारत-पाकिस्तान सीमेजवळील गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) कारवाई करत 4 पाकिस्तानी मच्छीमारांना ताब्यात घेतले.
रविवारी सर क्रीक परिसरातील दलदलीच्या भागात खेकडे पकडण्याच्या बहाण्याने हे मच्छीमार भारतीय जलक्षेत्रात दाखल झाल्याची माहिती आहे. या कारवाईदरम्यान बीएसएफने त्यांची मासेमारीची नौकाही जप्त केली. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
बीएसएफच्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या मच्छीमारांची नावे कादिर थैमोर, मुहम्मद मूसा, असगर थैमोर आणि अहसान जट अशी आहेत. हे चौघेही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील 'चाच जान खान' गावाचे रहिवासी आहेत. त्यांची सुरक्षा यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू आहे.सर क्रीक हा कच्छच्या रणातील गुजरात आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या किनारपट्टीदरम्यान असलेला अरुंद, भरती-ओहोटीच्या प्रभावाखालील खाडीचा भाग आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दीर्घकालीन सीमावादाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. या वादाचा संबंध अरबी समुद्रातील सागरी सीमारेषेच्या निर्धारणाशीही आहे.या परिसरातील उथळ पाणी, भरती-ओहोटी आणि विस्तीर्ण दलदलीचा प्रदेश यांमुळे नौकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे तसेच सीमारेषेची निगराणी करणे सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हानात्मक ठरते.
मासेमारीदरम्यान काही मच्छीमार नकळत, तर काही जाणीवपूर्वक सीमारेषा ओलांडत असल्याच्या घटना घडतात. त्यामुळे या भागातील सुरक्षा व्यवस्थेला विशेष महत्त्व आहे.भारताच्या पश्चिम सीमेवरील या संवेदनशील भागात बीएसएफकडून नियमित गस्त आणि देखरेख ठेवली जाते. अनधिकृत सीमा ओलांडणे तसेच इतर बेकायदा हालचाली रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. ताब्यात घेतलेल्या मच्छीमारांच्या चौकशीतून त्यांच्या भारतीय जलक्षेत्रातील प्रवेशाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

