Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

इंधनाच्या साठेबाजी आणि काळाबाजारावर ठाणे प्रशासनाची कडक नजर

ठाणे, 30 मे (हिं.स.) : ठाणे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासू नये आणि त्याचा काळाबाजार रोखला जावा, यासाठी प्रशासनाने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL), आयओसीएल (IOCL) या प्रमुख तेल कंपन्यांचे डेपो मॅनेजर, विभागीय विक्री अधिकारी, तसेच रिलायन्स जिओ आणि नायरा पेट्रोल पंपांचे प्रतिनिधी व वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

सध्या ठाणे जिल्ह्यात सर्व कंपन्यांचा मिळून एकूण ३ हजार २६० किलो लिटर पेट्रोल आणि १ हजार ३८८ किलो लिटर डिझेलचा साठा उपलब्ध आहे. यामध्ये कंपनीनिहाय पाहिल्यास, HPCL कडे १ हजार ६२६ KL पेट्रोल व १ हजार ७७२ KL डिझेल, BPCL कडे ४०१ KL पेट्रोल व ९९६ KL डिझेल, IOCL कडे ९९० KL पेट्रोल व १ हजार ३८५ KL डिझेल, Nayra कडे १३६ KL पेट्रोल व ८० KL डिझेल, तर Relience कडे १०७ KL पेट्रोल व ८५ KL डिझेलचा साठा उपलब्ध आहे.

सर्व संबंधित डेपोमधून नियमित पुरवठा सुरू असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे किंवा इंधनाचा अनावश्यक साठा करण्याचे कोणतेही कारण नाही. इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. आता पंपांवर वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम, कॅन किंवा बॉटलमध्ये इंधन मागणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती एका विशेष नोंदवहीत ठेवावी लागणार आहे. यामध्ये ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर, ओळखपत्र, इंधन घेण्याचे कारण, वापराचे ठिकाण आणि मोबाईलमधील फोटो यांसारख्या नोंदी जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दुसरीकडे, विविध महत्त्वाच्या संस्था व कामांसाठी पूर्वीप्रमाणेच सुरळीत इंधन पुरवठा व्हावा यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक कंपन्या, शासकीय बांधकाम उपक्रम, मेट्रो आणि एमएसआरडीसी (MSRDC) यांच्याकडून जिल्हा कार्यालयाकडे पत्रांद्वारे मागणी केली जात आहे. अशा संस्थांना त्यांच्या गरजेनुसार आणि मागील वापराचा विचार करून पेट्रोल व डिझेल दिले जाईल. यासाठी गृहनिर्माण संस्थांकडून मागणी पत्र, शेतकऱ्यांकडून ७/१२ आणि शासकीय काम करणाऱ्या संस्थांकडून वर्क ऑर्डर घेऊन त्यांना पूर्वीसारखाच इंधन पुरवठा करण्याचे आदेश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत.

साठेबाजीला लगाम घालण्यासाठी ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई सुरू झाली आहे. कळवा आणि शहापूर तालुक्यातील कसारा येथे डिझेलचा बेकायदेशीर साठा आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भविष्यात असा प्रकार घडू नये म्हणून सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस विभाग आणि तेल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर यांचे संयुक्त दक्षता पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक पेट्रोल पंपांची अचानक तपासणी करेल. तसेच ठाणे शहर, नवी मुंबई, मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पेट्रोल-डिझेलच्या टँकरची तपासणी करण्यासाठी विशेष पथके नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाहतुकीदरम्यान किंवा साठेबाजीत कुठेही काळाबाजार आढळल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ नुसार थेट गुन्हे नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी स्वतःहून शिस्त पाळून इंधन बचतीचे उपाय योजावेत. जर कोणाकडेही इंधनाची बेकायदेशीर साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याची खात्रीशीर माहिती असेल, तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा. शहरी भागातील नागरिकांनी उपनियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ ठाणे यांच्या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३०६६६५ वर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या ९३७२३३८८२७ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, जेणेकरून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi