Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

इंस्टाग्रामवर 'क्वीन' रील स्टारवर प्रसिद्ध तरुणी कॉपर वायर चोरी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात!

- ३२ हजार फॉलोअर्स असणाऱ्या तरुणीचा कारनामा; ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

लातूर, 28 मे (हिं.स.)। सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि हजारो फॉलोअर्सच्या गराड्यात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर चोरीच्या गुन्ह्यात जेरबंद केले आहे.

इंस्टाग्रामवर क्वीन रील स्टार नावाने प्रसिद्ध असलेल्या या तरुणीकडून पोलिसांनी चोरीच्या कॉपर वायर विक्रीतून मिळालेले ४१ हजार रुपये रोख जप्त केले आहेत. प्रिया जितेंद्र कांबळे (वय १९ वर्षे, रा. विलास नगर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे.

लातूर जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष अभियान सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि प्रमोद देशमुख यांचे पथक लातूर शहरात गस्त घालत होते. दरम्यान, दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास यशवंत शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या कडेला एक महिला संशयास्पदरित्या थांबली असून, ती चोरीच्या कॉपर वायर विक्रीतून मिळालेली रक्कम घेऊन उभी असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. तसेच ही तरुणी वारंवार कॉपर वायर चोरी करून भंगार विक्रेत्यांना विकत असल्याची माहितीही समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने संशयित तरुणीला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने तिचे नाव प्रिया कांबळे असे सांगितले. तिच्या जवळील लाल रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात मोठी रोख रक्कम आढळून आली.

पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने प्रकाश नगर परिसरातील बुद्धविहारासमोरील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून लाईटचे कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. हे चोरीचे वायर तिने फिरत्या भंगार विक्रेत्यांना विकले होते आणि त्यातून आलेली रक्कम स्वतःजवळ ठेवली होती.

'रील स्टार'चे ३२ हजार फॉलोअर्स

पोलीस अभिलेखाची पडताळणी केली असता, याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुरनं २७२/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. (भारतीय न्याय संहिता) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिच्याकडून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाईसाठी तिला एम.आय.डी.सी. पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेल्या प्रिया कांबळेबद्दल अधिक माहिती काढली असता, ती इंस्टाग्रामवर 'क्वीन रील स्टार' म्हणून प्रसिद्ध असून तिचे जवळपास ३२,००० फॉलोअर्स असल्याचे तपासात उघड झाले आहे. सोशल मीडियावरील या 'क्वीन'चा खरा चेहरा समोर आल्याने लातूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi