Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिण लेबनॉनमध्ये १४ जणांचा मृत्यू

इस्रायली हल्ल्यांमुळे दक्षिण लेबनॉनमध्ये १४ जणांचा मृत्यू

बेरूत, 28 मे (हिं.स.)।दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा भडकला आहे. ताज्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

वॉशिंग्टनमध्ये दोन्ही पक्षांदरम्यान सुरक्षा चर्चेची तयारी सुरू असतानाच हे हल्ले झाले आहेत.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालय आणि राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील अनेक शहरांवर जोरदार हवाई हल्ले केले. यात टायर, सिडोन आणि नबातियेह या भागांचा समावेश आहे. टायरजवळ ड्रोन हल्ल्यात मोटारसायकलवरून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला, तर सिडोनमध्ये एका अपार्टमेंट इमारतीवर झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा जीव गेला आणि अनेक जण जखमी झाले.

सिडोनमधील हल्ल्यात विस्थापित कुटुंबे राहत असलेल्या घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेला अत्यंत वेदनादायक आणि भीषण असल्याचे म्हटले आहे. नबातियेहजवळ झालेल्या आणखी एका ड्रोन हल्ल्यात लेबनॉन सैन्याचा एक जवान ठार झाला, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही आपल्या एका सैनिकाच्या मृत्यूची पुष्टी केली असून तो हिजबुल्लाच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला असल्याचे सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये इस्रायल आणि लेबनॉनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. मात्र, वाढलेल्या हल्ल्यांच्या तीव्रतेमुळे चर्चेपूर्वीच तणाव अधिक वाढला आहे. इस्रायलने हिजबुल्लाकडून होत असलेल्या ड्रोन आणि रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाई तीव्र केली आहे, तर हिजबुल्लानेही प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचा दावा केला आहे. या संघर्षामुळे लेबनॉनमध्ये आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने नागरिक जखमी झाले आहेत. परिस्थिती अद्याप अत्यंत गंभीर असून मध्य पूर्वेतील शांतता प्रयत्नांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi