जळगाव, 30 मे (हिं.स.) | भुसावळमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या एका कारने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी झाला आहे.
हा अपघात सुनसगाव-बेलव्हाळ चौफुली परिसराजवळ घडला असून आरती उमाकांत भारंबे (वय ४०, रा वराडसिम) असं मयत महिलेचं नाव आहे. अपघातानंतर कार चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला.
भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील रहिवासी आरती भारंबे (वय ४०) या आपले पती उमाकांत विठ्ठल भारंबे यांच्यासोबत दुचाकीने (क्र. एमएच १९ डीआर ३२४१) खेडी जळगाव येथून पापड तयार करण्याचे काम उरकून घरी परतत होत्या. त्यांची दुचाकी सुनसगाव मार्गे बेलव्हाळ फाट्याकडे जात असताना, गोजोरे गावाकडून नशिराबादकडे अत्यंत भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (क्र. एमएच ०४ ईडी ५६२) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा मोठा चक्काचूर झाला.
अपघातानंतर जखमी दाम्पत्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने आरती भारंबे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पती उमाकांत भारंबे यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच सुनसगावचे पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे आणि पोलीस हेकॉ धीरज मंडलिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अपघातग्रस्त कार आणि दुचाकी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. अपघातानंतर कार चालक वाहन सोडून घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
