जळगाव, 01 ऑगस्ट (हिं.स.)| जळगावच्या जामनेर तालुक्यातील वडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आंतरजातीय प्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, फत्तेपूर पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली आहे मृत तरुणाचे नाव प्रशांत सुभाष चौधरी (वय २९) असे आहे. तर या प्रकरणातील आरोपी अभिषेक संतोष मोरे याला फत्तेपूर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी आणि आरोपीची बहीण यांनी काही काळापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहाचा राग आरोपी अभिषेक मोरे याच्या मनात होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून आरोपीने प्रशांतवर दगडाने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात प्रशांत चौधरी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर फत्तेपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात आता खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर
