Dailyhunt
जलसंधारणाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही - मंत्री संजय राठोड

जलसंधारणाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही - मंत्री संजय राठोड

लातूर, 06 मे (हिं.स.)। मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करत, "जलसंधारणाच्या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही," अशी ग्वाही दिली.

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरावा यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान व गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री राठोड यांनी फत्तेपूर, दावतपूर, तांबरवाडी, राजेवाडी या गावांमध्ये सुरू असलेल्या नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच विविध विकासकामांचाही आढावा घेतला.

'जलसमृद्ध औसा' अभियानाला गती

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून तालुक्यात "जलसमृद्ध औसा" अभियान राबविण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात सात गावांची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे जलसाठा निर्माण होऊन भूजल पातळीत वाढ होईल आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन फायदा होईल, असे मंत्री राठोड यांनी नमूद केले.

या गावांमध्ये बंधारे बांधणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती, नाला खोलीकरण यांसारखी कामे मोठ्या प्रमाणात केली जात असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. गावांच्या विकासात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न

औसा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांद्वारे भूजल पुनर्भरण वाढवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला जात आहे. "जलसमृद्ध औसा" अभियानांतर्गत शासनाच्या विविध योजनांची एकत्रित अंमलबजावणी केली जात आहे.

पहिल्या टप्प्यात तांबरवाडी, दावतपूर, महादेववाडी, फत्तेपूर, पारदेवाडी, कवळी (हि.) आणि हिप्परगा (क.) या सात गावांची निवड करण्यात आली आहे. या कामांमध्ये राज्य शासनासह टाटा मोटर्स फाउंडेशन, नाम फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांचा सहभाग आहे, अशी माहिती आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. पुढील टप्प्यात तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्याचेही त्यांनी सांगितले.

नाला खोलीकरण व विकासकामांची पाहणी

मंत्री राठोड यांनी फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे तसेच तांबरवाडी व राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. दावतपूर येथे अभिसरणातून उभारण्यात आलेली अंगणवाडी इमारत, कांदाचाळ, जनावरांचा गोठा यासह विविध कामांचा आढावा घेतला. तसेच नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अमृत तलाव संवर्धनाच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. मंत्री राठोड यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

या दौऱ्यात माजी आमदार दिनकर माने, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi