Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कर्जतमध्ये सराफ व्यापाऱ्याची सोन्याची अंगठी व रोकड लंपास

कर्जतमध्ये सराफ व्यापाऱ्याची सोन्याची अंगठी व रोकड लंपास

र्जत, ३० जुलै (हिं.स.) : कर्जत शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत भामट्यांनी फसवणुकीची नवी शक्कल वापरत एका सराफ व्यापाऱ्याची सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ८ ते १० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना भरदिवसा घडली.

या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेतील 'आदिनाथ गोल्ड'चे मालक केवळचंद ओसवाल हे दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी घरी जात असताना टिपटॉप दुकानाजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांना अडवले. तुम्ही मला ओळखता का? असा प्रश्न विचारत त्याने मैत्रीपूर्ण संवाद सुरू केला. त्यानंतर जवळच्या गल्लीत माझे येथे ऑफिस आहे, असे सांगून त्यांना काही वेळ बोलण्यात गुंतवून ठेवले. दरम्यान, त्याचे आणखी दोन साथीदार तेथे आले.

काही मिनिटांतच तिन्ही संशयित तेथून पसार झाले. त्यानंतर ओसवाल यांनी स्वतःकडे पाहिले असता त्यांच्या खिशातील ८ ते १० हजार रुपयांची रोकड आणि हातातील सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरी नेमकी कशी झाली, याचा अंदाज त्यांनाही आला नसल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये संशयित कपालेश्वर मंदिराजवळील रिक्षा स्टँडवरून रिक्षाने पसार झाल्याचे दिसून आले असून, तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi