Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कट मारल्याच्या कारणावरून आठ जणांकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण; कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल

कट मारल्याच्या कारणावरून आठ जणांकडून दुचाकीस्वाराला बेदम मारहाण; कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल

रायगड, 08 जुलै (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील नांगुर्ले येथील कचरा डेपोजवळ किरकोळ वाहतूक वादातून एका दुचाकीस्वाराला आठ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत एका आरोपीने दगडाने डोक्यावर वार केल्याने दुचाकीस्वार जखमी झाला.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रसायनी येथून पळसदरी येथील स्वामी समर्थ मठात दुचाकीवरून जात होते. पळसदरी फाटा येथे आल्यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या एमएच-१५-केयू-८६४८ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या इको कारने त्यांच्या दुचाकीला धोकादायक पद्धतीने कट मारला. त्यानंतर नांगुर्ले येथील कचरा डेपोजवळ कार थांबविण्यात आली.

फिर्यादी यांनी कारचालकाला गाडी नीट चालवा, कट मारल्यामुळे माझा जीव गेला असता, असे सांगितल्याचा राग मनात धरून कारमधील आठ जण खाली उतरले. त्यांनी फिर्यादीला हाताबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना चिखलात पाडून पुन्हा मारहाण करण्यात आली.

मारहाणीदरम्यान काळा टी-शर्ट आणि खाकी रंगाची पँट घातलेल्या एका आरोपीने फिर्यादीच्या डोक्याच्या मध्यभागी दगडाने वार करून त्यांना गंभीर दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८६/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शरद रोकडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi