Dailyhunt
खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी रायगड जिप मैदानात; अंगणवाड्यांतूनच इंग्रजी शिक्षणाची सुरुवात

खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी रायगड जिप मैदानात; अंगणवाड्यांतूनच इंग्रजी शिक्षणाची सुरुवात

रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। खासगी शाळांकडे वाढणारा ओढा आणि जिल्हा परिषद शाळांमधील घटती पटसंख्या रोखण्यासाठी अखेर रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. आता जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधूनच बालकांना इंग्रजीचे प्राथमिक धडे दिले जाणार असून, या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात नवी स्पर्धा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत असून, विद्यार्थी अभावामुळे मागील दोन वर्षांत तब्बल ५१ शाळांना कुलूप लागले आहे. यामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठत असतानाच, आता हा अभिनव उपक्रम राबवून परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अंगणवाड्यांमध्ये इंग्रजीचे धडे नसल्यामुळे पालक आपल्या मुलांना खासगी शाळांच्या पूर्व-प्राथमिक वर्गात दाखल करत आहेत. एकदा खासगी शाळांकडे वळलेले विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे फिरकत नाहीत, अशी वस्तुस्थिती शिक्षक संघटनांनी बैठकीत मांडली. याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

येत्या शैक्षणिक वर्षापासून निवडक अंगणवाड्यांमध्ये इंग्रजी शिक्षणाचा पायलट प्रकल्प सुरू केला जाणार असून, टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी विशेष अभ्यासक्रम आणि शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहान वयातच इंग्रजीचे ज्ञान मिळणार असून, खासगी व शासकीय शिक्षणातील दरी कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, महिला व बालविकास सभापती यांच्यासह सर्व पदाधिकारी व अधिकारी या उपक्रमाबाबत सकारात्मक असल्याचे समजते.

दरम्यान, "अंगणवाडीपासून इंग्रजी शिक्षण देण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे," असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi