Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुंभमेळ्यापूर्वी विकासकामे पूर्ण होणार; 'उन्नत नाशिक' अभियानाला वेग

कुंभमेळ्यापूर्वी विकासकामे पूर्ण होणार; 'उन्नत नाशिक' अभियानाला वेग

नाशिक, 01 मे (हिं.स.) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली सर्व विकासकामे पुढील वर्षी मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त नाशिक येथील पोलिस कवायत मैदानावर आयोजित ध्वजवंदन समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिकेही प्रदान करण्यात आली तसेच पोलिस दलाने आकर्षक संचलन सादर केले.

यावेळी महाजन यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींनी दिलेला विचारांचा वारसा महाराष्ट्र पुढे नेत आहे. राज्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली असून भविष्यातही हा प्रवास कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. गोदावरी नदी स्वच्छ व प्रवाही राहावी यासाठीही विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.

"स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक" या उद्दिष्टासाठी 'उन्नत नाशिक अभियान' राबविण्यात येत असून या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यावर भर दिला जात आहे. पुढील २५-३० वर्षांचा विचार करून शहर व जिल्ह्याचे नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, विशेषतः वृद्ध व बालकांचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. संभाव्य एल निनोमुळे पावसावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेता जलसंवर्धनाच्या उपाययोजना गतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी खरीप हंगामासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" या अभियानावरही भर देण्यात आला. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

समारंभात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. लान्स नायक संतोष खिरकाडे यांना शौर्याबद्दल आर्थिक सन्मान देण्यात आला, तर महिला व बालकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi