- प्रति शेअर किंमत पट्टा 398-419 रुपये
मुंबई, 03 जुलै (हिं.स.)। सिंथेटिक फॅब्रिक तयार करणारी कंपनी कुसुमगर लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) 08 जुलैला खुलणार आहे.
गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 10 जुलै, 2026 पर्यंत बोली लावून गुंतवणूक करू शकतात. यासाठी प्रति शेअर 398 ते 419 रुपये असा किंमत पट्टा (प्राइस बँड) निश्चित करण्यात आला आहे.
कंपनीने शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, कुसुमगर लिमिटेडचा आयपीओ 08 जुलैला खुलणार असून 10 जुलै, 2026 रोजी बंद होणार आहे. या आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदार 7 जुलै रोजी बोली लावू शकतात. कंपनीने यासाठी प्रति शेअर 398 ते 419 रुपये असा किंमत पट्टा (प्राइस बँड) निश्चित केला आहे.
कुसुमगर लिमिटेडचा आयपीओ 650 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (ओएफएस) आहे. कंपनीच्या 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या इश्यूमध्ये गुंतवणूकदार किमान 35 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 35 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. कंपनीने आपल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी 3.5 कोटी रुपयांचे शेअर्स राखीव ठेवले असून, त्यांना अंतिम इश्यू किमतीवर प्रति शेअर 39 रुपयांच्या सवलतीसह हे शेअर्स मिळतील. या शेअर्सचे वाटप 13 जुलैपर्यंत अंतिम होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे शेअर्स 15 जुलै रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
विशेष म्हणजे, 1990 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी विणलेल्या, कोटेड आणि लॅमिनेटेड सिंथेटिक कापडांची उत्पादक असून, या कापडांना इंजिनिअर्ड फॅब्रिक्स म्हणून ओळखले जाते. कुसुमगर लिमिटेड पॉलियामाइड्स, पॉलिएस्टर फिलामेंट्स आणि पॉलीयुरेथेन रसायनशास्त्रावर लक्ष केंद्रित करून इंजिनिअर्ड फॅब्रिक्स आणि विविध उपाय उपलब्ध करून देते, जे आपल्या ग्राहकांच्या उच्च कार्यक्षमतेच्या गरजा पूर्ण करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

