Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

लाळखुरकत रोगासाठी ११९ लक्ष लस मात्रा उपलब्ध होणार; शीतगृहांची क्षमता तपासण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर, 28 मे (हिं.स.)।

राज्यात लाळखुरकत रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण फेरी-९ साठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली असून, मे महिनाअखेरीस राज्याला तब्बल ११९ लक्ष (१ कोटी १९ लाख) लस मात्रा उपलब्ध होणार आहेत.

लसींचा सुरक्षित साठा व सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी विभागामार्फत नियोजनाला वेग देण्यात आला आहे.

लसींच्या मोठ्या साठ्यासाठी राज्यात नव्याने २० 'वॉक-इन कोल्ड-रूम' उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक नवीन शीतगृहामध्ये सुमारे ३ लक्ष लस मात्रा सुरक्षितपणे साठविण्याची क्षमता असून, यामुळे राज्याची एकूण लस साठवणूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय, विभागातील पूर्वीपासून कार्यरत शीतगृहेही पूर्ण क्षमतेने वापरात ठेवण्यात येणार आहेत.

राज्यात आतापर्यंत लाळखुरकत लसीकरणाच्या ८ फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या असून, प्रभावी लसीकरणामुळे गतवर्षांमध्ये रोगाचा उद्रेक आढळून आलेला नाही. देशातील ९ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश लाळखुरकत रोगमुक्त पट्टा निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे. सलग दोन वर्षे रोगप्रादुर्भाव आढळून न आल्यास राज्याला लाळखुरकत रोगमुक्त दर्जा प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे दुग्ध, मांस व अंडी यांसारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीस मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार ८ वी फेरी पूर्ण करण्यात आली असून, ९ व्या फेरीसाठी शीतसाखळी मूल्यांकन, जनजागृती तसेच खाजगी लसीकरणकर्त्यांची नियुक्ती याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पशुचिकित्सालय स्तरावरील तसेच सर्व शीतगृहांमधील जिल्हानिहाय लस साठवणुकीची अचूक क्षमता त्वरित सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्याला आवश्यकतेनुसार लससाठा उपलब्ध व्हावा व वितरण प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्याचे नियोजन विभागामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi