Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूर : बनावट सोन्याच्या बिस्किटांनी महिलांना फसवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, ५ आरोपी अटकेत

लातूर : बनावट सोन्याच्या बिस्किटांनी महिलांना फसवणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, ५ आरोपी अटकेत

लातूर, 31 जुलै (हिं.स.)। अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना खोट्या व बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन त्यांच्याकडील मौल्यवान दागिने लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा अहमदपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत याप्रकरणी ५ आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार, बनावट सोन्याची बिस्कीटे आणि सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी उज्वला शिवाजी गायकवाड (रा. हाळणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अज्ञात आरोपींनी फिर्यादी महिलेस १० ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट देतो असे सांगून तुमच्या गळ्यातील जुने मंगळसूत्र द्या, असे म्हणत पिवळ्या रंगाचे चमकणारे खोटे बिस्कीट दाखवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने काढून घेत फसवणूक केली होती. अशाच प्रकारची आणखी एक घटना दिनांक २७ जुलै २०२६ रोजी घडली होती, ज्यामध्ये फिर्यादी कौशाबाई सुरेश आलापूरे यांच्याकडून ७ ग्रॅम वजनाचे झुमके अशाच पद्धतीने लांबवण्यात आले होते. या दोन्ही घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

सदर दोन्ही गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाला (डी.बी. पथक) तपासाचे आदेश दिले. त्यानुसार अहमदपूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे व कौशल्यपूर्ण तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका दिवसात गुन्ह्यातील ५ आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेली एर्टिगा कार (किंमत अंदाजे ५ लाख रुपये), बनावट सोन्याची ४ बिस्कीटे आणि गुन्ह्यात गेलेला ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत अंदाजे १२,००० रुपये) व ७ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके (किंमत अंदाजे २८,००० रुपये) असा एकूण ५,२८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या पथकाने पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी आरदवाड हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi