Dailyhunt
लातूर जिल्हा रुग्णालयाचा 'मास्टर प्लान' तयार करावा - आ. अमित देशमुख

लातूर जिल्हा रुग्णालयाचा 'मास्टर प्लान' तयार करावा - आ. अमित देशमुख

लातूर, 06 मे (हिं.स.)। लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती दिल्याबद्दल माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयाचे काम अधिक दर्जेदार आणि भविष्यवेधी व्हावे, यासाठी काही महत्त्वाच्या मागण्या व सूचनांचे निवेदन सादर केले.

खाटांची संख्या वाढवण्याची मागणी

लातूर जिल्ह्याची सध्याची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता, प्रस्तावित रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार अमित देशमुख यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशी आरोग्य सेवा मिळावी, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञ सल्लागार आणि 'मास्टर प्लान'वर भर

नवीन जिल्हा रुग्णालय उभारणीच्या प्रक्रियेत राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने अलीकडच्या काळात काही सुधारणा आणि मार्गदर्शक सूचना सुचवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी रुग्णालयाचे निकष, अटी आणि शर्तींची काटेकोर पूर्तता होण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी रुग्णालय सल्लागार (वास्तुविशारद) यांची नियुक्ती करावी. नियुक्त सल्लागाराकडून संपूर्ण रुग्णालय संकुलाचा एक सर्वंकष 'मास्टर प्लान' तयार करून घ्यावा. या मास्टर प्लानमध्ये संबंधित सर्व विभागांच्या सूचनांचा अंतर्भाव व्हावा, यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी त्यांनी केली.

आरोग्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी मांडलेल्या या सर्व तांत्रिक आणि धोरणात्मक मागण्यांची सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी या सर्व मुद्द्यांवर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रशासकीय पातळीवर या मागण्यांची नोंद घेण्यात आल्याचे सांगितले. या महत्त्वपूर्ण चर्चेमुळे लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रकल्प आता अधिक आधुनिक आणि सक्षम स्वरूपात साकारला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi