लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।लातूर जिल्ह्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-गव्हर्नन्स विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील तालुके, महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत आणि ग्रामपंचायत क्षेत्रांमधील एकूण ६४० रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
कोणाला करता येणार अर्ज?
अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने किमान १२ वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक असून MS-CIT किंवा CCC प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे.अर्जदार संबंधित ग्रामपंचायत किंवा शहरी क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक खाते आणि आवश्यक ओळखपत्रे असणे गरजेचे आहे.
अर्जदारावर नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत कोणताही ठपका अथवा दोष सिद्ध झालेला नसावा.
१५ सप्टेंबरपर्यंत अर्जाची संधी
या प्रक्रियेसाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
सेवा केंद्राशी संबंधित सविस्तर जाहिरात, नियम व अटी लातूर जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांशी कोणताही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नसल्याने अर्जदारांनी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सेवा केंद्रांची मंजुरी, निवड प्रक्रिया, केंद्र वाटप तसेच इतर सर्व बाबींविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय सेतू समितीचे अध्यक्ष यांच्याकडे राखीव असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

