Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायांसाठी संयुक्त मोहीम

लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपायांसाठी संयुक्त मोहीम

लातूर, 04 ऑगस्ट (हिं.स.) : शहरातील वाढती वाहतूक, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी परिवहन समिती, लातूर महानगरपालिका आणि लातूर शहर पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली.

उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस शहर विभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जिरगे, परिवहन समितीचे सदस्य तसेच लातूर महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील प्रमुख चौकांमध्ये बंद असलेले वाहतूक सिग्नल, वाढती वाहतूक कोंडी, गोलाई परिसरातील अतिक्रमण आणि त्यावर प्रभावी उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली. तसेच गोलाई परिसरासह प्रमुख रस्त्यांवर फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, हातगाडीधारक आणि इतर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्याचेही नमूद करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर शहरातील बंद असलेले सर्व वाहतूक सिग्नल तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत आवश्यक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गोलाई परिसरासह शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक ठिकाणी वाहतूक नियंत्रण उपाययोजना, रस्त्यांचे सुयोग्य नियोजन, पार्किंग व्यवस्थेचे नियमन तसेच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती वाढविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

लातूर शहर वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी पोलीस प्रशासन व लातूर महानगरपालिका यांच्यात सातत्याने समन्वय ठेवून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून तसेच रस्त्यांवर अतिक्रमण न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीच्या शेवटी करण्यात आले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi