लातूर, 27 ऑगस्ट (हिं.स.)। चाकूर तालुक्यातील वडवळ येथील रेल्वे उड्डाणपूल, वडवळ बायपास आणि आष्टा मोड येथील रेल्वे उड्डाणपूल या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्पांना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही आनंदाची माहिती दिली असून, त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील दळणवळण सुरळीत व्हावे यासाठी या प्रकल्पांची मागणी केली जात होती. या दोन्ही उड्डाणपुलांमुळे आणि बायपासमुळे परिसरातील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटण्यास मदत होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. तसेच नागरिकांचा मौल्यवान वेळही वाचणार आहे.
रेल्वे मार्गामुळे वारंवार होणारे वाहतुकीचे अडथळे दूर करून स्थानिक दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही मंजुरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकल्पांमुळे वडवळ आणि आष्टा मोड परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच दररोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सकारात्मक भूमिका घेत मंजुरी मिळवून दिल्याबद्दल सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. सहकार मंत्र्यांच्या या पाठपुराव्यामुळे चाकूर तालुक्याच्या विकासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
