लातूर, 05 मे (हिं.स.) : लातूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण करून सर्वसामान्यांची लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे.
या निवेदनाद्वारे इंधन पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव आणि जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशात महागाईमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत इंधन पुरवठा कंपन्या आणि काही पेट्रोल पंप चालकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.
सरकारकडून इंधनाची कमतरता नसल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्षात अनेक पेट्रोल पंपांवर 'इंधन उपलब्ध नाही' असे फलक लावण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागत आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर प्रशासनाचा इंधन तुटवडा नसल्याचा दावा खरा असेल, तर अनेक पंपांवर इंधन नसल्याचे फलक का लावले जात आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच साठेबाजी करणाऱ्या पंप चालकांवर तात्काळ कारवाई करून इंधन पुरवठा सुरळीत करावा.
दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

