Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूरमध्ये सारथी संकुल विस्तारासाठी अतिरिक्त जमीन देण्याची मागणी

लातूरमध्ये सारथी संकुल विस्तारासाठी अतिरिक्त जमीन देण्याची मागणी

लातूर, 28 मे (हिं.स.) : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येत असलेल्या लातूर येथील सारथी संकुलाच्या भविष्यातील विस्तारासाठी अतिरिक्त १.६० हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात आमदार पवार यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मौजे वरवंटी, ता. जि. लातूर येथील सर्वे नं. १११ मधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), लातूर यांच्या मालकीच्या एकूण ६.०७ हेक्टर क्षेत्रापैकी १.६० हेक्टर जमीन यापूर्वीच सारथी संस्थेस देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी शासनाने १७२.८६ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली असून, विभागीय सारथी संकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या येथे १३ मजली दोन भव्य इमारतींचे बांधकाम सुरू असून, हे संकुल मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, संशोधन तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित होत आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सारथी संकुलालगत मागील बाजूस १.६० हेक्टर अतिरिक्त जमीन उपलब्ध आहे. या जागेस स्वतंत्र रस्ता नसल्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून सध्या तिचा कोणताही उपयोग होत नाही. तसेच संस्थेच्या विद्यमान वापरासाठी २.८७ हेक्टर जागा पुरेशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या अतिरिक्त जागेचा उपयोग भविष्यात वाढत्या विद्यार्थी संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ, खुली अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, प्रशिक्षण व कौशल्य विकास उपक्रम, वाचनालय, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा व मैदानी सुविधांसाठी करता येऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi