Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूरात खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते टी-१० सामन्याचे बक्षीस वितरण

लातूरात खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते टी-१० सामन्याचे बक्षीस वितरण

लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून लातूर येथे ड्रीम्स क्रिकेट अकॅडमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंध क्रिकेट टी-१० सामन्याचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

या सामन्यात सहभागी झालेल्या अंध क्रिकेटपटूंनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर क्रीडा क्षेत्रातील आपली क्षमता दाखवून दिली. या सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहून विजेता संघ तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अंध खेळाडूंनी मैदानावर दाखवलेली जिद्द आणि खेळातील कौशल्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळण्याची गरज अधोरेखित झाली. अंधत्व हे खेळातील अडथळा नसून इच्छाशक्ती, सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही आव्हान पेलता येते, असा संदेश या सामन्यातून देण्यात आला. बक्षीस वितरण समारंभास डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. सुरेखा काळे, डॉ. राजेश दरडे, विजय राठी, माधव गोरे, शिक्षक अमोल निलंगेकर, हरिश काळे आणि डॉ. निखिल काळे यांच्यासह अंध क्रिकेटपटू, शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच ड्रीम्स क्रिकेट अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी अंध खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करत त्यांना भविष्यातील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे अंध खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळते, तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. ड्रीम्स क्रिकेट अकॅडमीच्या या उपक्रमामुळे लातूरच्या क्रीडा क्षेत्रात समावेशकतेचा सकारात्मक संदेश पोहोचला असून, अंध खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धांचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi