Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लातूरात मटका-जुगार अड्ड्यांवर धाडी; ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लातूरात मटका-जुगार अड्ड्यांवर धाडी; ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लातूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूर जिल्ह्यात पाठवलेल्या विशेष पथकाने मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली.

भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळखेडा आणि औसा शहरातील कालन गल्ली येथे करण्यात आलेल्या दोन कारवायांमध्ये ३१ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष पथकाने भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गुळखेडा येथे बालाजी सुरवसे याच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच खंडू भोसले याच्या हॉटेलमध्ये जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ३४ हजार ३२० रुपयांची रोकड, १५ मोबाईल आणि दोन मोटारसायकली, असा एकूण ३ लाख ६० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १७ जणांना ताब्यात घेऊन भादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८०/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विशेष पथकाने औसा शहरातील कालन गल्ली येथील अबुझर अतिक शेख याच्या इमारतीतील मटका बुकीवरही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ८८० रुपयांची रोकड आणि ६९ हजार ४०० रुपये किमतीचे १० मोबाईल, असा एकूण ९२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १४ आरोपींना ताब्यात घेऊन औसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९८/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींकडून ५७ हजार २०० रुपयांची रोकड, २५ मोबाईल आणि दोन मोटारसायकली, असा एकूण ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदीप वाघाडे आणि पोहेकॉ गजानन डवरे यांच्या पथकाने केली. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

'खबर' हेल्पलाइनवर अवैध व्यवसायांची माहिती द्या

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविता यावी, यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने 'खबर' हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील मटका, जुगार तसेच इतर अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या मोबाईल क्रमांकावर द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi