Dailyhunt
मध्यप्रदेश : बरगी धरणात क्रूझ बुडाले, 5 जणांचा मृत्यू,10 बेपत्ता

मध्यप्रदेश : बरगी धरणात क्रूझ बुडाले, 5 जणांचा मृत्यू,10 बेपत्ता

बलपूर. 30 एप्रिल (हिं.स.) : मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात झालेल्या अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला. पर्यटकांनी भरलेली एक क्रूझ नौका खमरिया टापूजवळ असंतुलित होऊन बुडाली.

या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 10 जण अद्याप बेपत्ता आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जबलपूरपासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेला बरगी बांध नर्मदा नदीवर बांधलेला एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बांध सिंचन, 90 मेगावॅट वीज निर्मिती आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे बोटिंग आणि क्रूझ सफरीसाठी दररोज पर्यटक येतात. याठिकाणी गुरुवारी, संध्याकाळी 5.30 वाजता क्रूझ पर्यटकांना घेऊन नर्मदा नदीवरील बरगी धरणात फिरत होती. अचानक हवामान बिघडले आणि जोरदार वारे सुटल्याने क्रूझमध्ये पाणी शिरू लागले. काही क्षणांतच बोट नियंत्रणाबाहेर जाऊन बुडाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अनेक प्रवासी जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारताना दिसले. परिसरात मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. अंधार आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत, तरीही शोधमोहीम सुरूच आहे.प्राथमिक माहितीनुसार, क्रूझमध्ये कॅप्टनसह सुमारे 30 लोक होते. बचाव पथकाने 15 जणांना सुरक्षित बाहेर काढले असून 5 मृतदेह सापडले आहेत. क्रूझ कॅप्टन महेश पटेल यांनाही नंतर वाचवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्य तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.सरकारने जाहीर केले आहे की, बचावकार्याला पूर्ण गती देण्यात आली असून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.-----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi