Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाभियोगाच्या प्रस्तावानंतर ट्रम्प यांचा पीट हेगसेथ यांना पाठिंबा

महाभियोगाच्या प्रस्तावानंतर ट्रम्प यांचा पीट हेगसेथ यांना पाठिंबा

वॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांची पाठराखण केली आहे. हेगसेथ यांनी दोन युद्धे जिंकली आहेत, मग त्यांना पदावरून हटवण्याची मागणी का केली जात आहे, असा सवाल ट्रम्प यांनी उपस्थित केला.

इराणविरोधात युद्ध करणे आवश्यक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.हेगसेथ यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी ट्रम्प यांनी फेटाळून लावली. ही मागणी चुकीची असल्याचे सांगत त्यांनी महाभियोगाचा प्रस्ताव मांडणारे रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांना 'लूझर' अर्थात पराभूत व्यक्ती असे संबोधले.

ट्रम्प म्हणाले की, इराणविरोधातील लष्करी मोहिमेत अमेरिकेचे केवळ १८ सैनिक मारले गेले. याउलट व्हिएतनाम युद्धात सुमारे ६५ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.अमेरिका इराणमध्ये गेल्या सात महिन्यांपासून लष्करी मोहीम राबवत आहे, तर व्हिएतनाममध्ये अमेरिकी सैन्य तब्बल २१ वर्षे तैनात होते.

ट्रम्प म्हणाले,व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धे लढणाऱ्यांवर महाभियोग का चालवण्यात आला नाही? त्या युद्धांमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि त्यातून काहीही साध्य झाले नाही.महाभियोगाचा प्रस्ताव मांडणारे केंटकीचे रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांच्यावरही ट्रम्प यांनी टीका केली. मॅसी हे पक्षाच्या चांगल्या विधेयकांनाही विरोध करतात आणि संसदेचा वेळ वाया घालवतात, असे ते म्हणाले.

संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही इराणविरोधातील लष्करी कारवाईचे समर्थन केले. ट्रम्प यांचा निर्णय योग्य होता आणि गरज भासल्यास पुन्हा अशीच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.हेगसेथ यांच्या मते, इराण अण्वस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याचबरोबर त्याने क्षेपणास्त्रांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली होती. त्यामुळे इराणचा अणुकार्यक्रम रोखणे कठीण झाले होते.ट्रम्प प्रशासनाने 'ऑपरेशन मिडनाइट हॅमर' आणि 'ऑपरेशन एपिक फ्युरी' या लष्करी मोहिमांच्या माध्यमातून इराणच्या अणुकेंद्रांचे मोठे नुकसान केले आणि त्याला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखले, असा दावाही हेगसेथ यांनी केला.महाभियोगाचा प्रस्ताव रोखण्यासाठी रिपब्लिकन खासदारांना या आठवड्यात पुरेशी मते मिळवता येतील का, असा प्रश्न हेगसेथ यांना विचारण्यात आला. त्यावर, आम्हाला याची कोणतीही चिंता नाही, असे त्यांनी सांगितले.

रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांनी सोमवारी अमेरिकेच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या 'हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मध्ये हेगसेथ यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला होता.हेगसेथ यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि इराणविरोधात युद्ध सुरू करण्यासाठी बेकायदेशीर आदेश दिले, असा आरोप मॅसी यांनी केला आहे.अमेरिकन संसदेच्या नियमांनुसार, या प्रस्तावावर बुधवारपर्यंत प्राथमिक मतदान होणे आवश्यक आहे.यापूर्वी हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते हकीम जेफ्रीज यांनीही हेगसेथ यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi