Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मनमाड - घरमालकांच्या परवानगीशिवाय वीज तारा टाकल्याने उपविभागीय अभियंत्यांना निवेदन

Hindusthan Samachar 4 months ago

मनमाड, 30 मे, (हिं.स.)। भारतीय विद्युत कायदा २००३ आणि भारतीय तारायंत्र कायदा १८८५ मधील कलमांचा गैरवापर करत, मनमाड येथील 'महावितरण' (MSEDCL) कंपनीने खाजगी घरमालक व भोगवटादारांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या घरांवरून वीज वाहक तारा टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या मनमानी कारभाराविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेतला असून, या तारा तात्काळ हटवण्यात याव्यात यासाठी उपविभागीय विद्युत अभियंता, मनमाड यांना एक जाहीर इशारा (निवेदन) दिले आहे.

मनमाड शहरातील विविध भागांत वीज कंपनीकडून नवीन विद्युत वाहक तारा टाकण्याचे काम सुरू आहे. भारतीय विद्युत कायदा, २००३ चे कलम ६७ आणि भारतीय तारायंत्र कायदा, १८८५ चे कलम १० या कायदेशीर तरतुदींचा आधार घेत वीज कंपनीने नागरिकांच्या खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण केले आहे. कायदा केवळ सार्वजनिक हितासाठी अपवादात्मक परिस्थितीत अधिकार देतो, परंतु महावितरणने स्थानिक नागरिकांना, घरमालकांना विश्वासात न घेता किंवा त्यांची कोणतीही संमती न घेता थेट छतावरून आणि घराच्या अगदी जवळून हायव्होल्टेज तारा ओढल्या आहेत.

घरावरून गेलेल्या या विद्युत तारांमुळे भविष्यात मोठी जीवितहानी किंवा गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वंचित बहुजन आघाडीचा महावितरणला आंदोलनाचा इशारा देत श्रावस्ती नगरच्या नागरिकांच्या या समस्येची दखल घेत मनमाड उपविभागाचे विद्युत अभियंता यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, सार्वजनिक कामाच्या नावाखाली नागरिकांच्या खाजगी हक्कांवर गदा आणली जात आहे. घरमालकांना अंधारात ठेवून टाकण्यात आलेल्या या वीज तारा तात्काळ हटवण्यात याव्यात. जर महावितरणने यावर तातडीने कारवाई केली नाही आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi