नाशिक, 04 एप्रिल (हिं.स.)।
: नाशिक मधील बहुचर्चित म्हाडा घोटाळ्याहून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून, पुढील १५ दिवसांत अहवाल त्यांच्या कडे येणार आहे.
त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे देणार असल्याचे भाजप नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. यादरम्यान ते पुढे म्हणाले की अशोक खरात याला मदत करणाऱ्या महसूल विभागातील अधिकाऱ्यांना थेट निलंबित केलं जाणार आहे
शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरीलआडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव , शहराध्यक्ष सुनील केदार, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगरसेवक सुरेश पाटील, सुरेश खेताडे, नामदेव शिंदे, रिद्धेश निमसे आदी उपस्थित होते.
मंत्री बावनकुळे म्हणाले की, म्हाडाची "गरिबांसाठी असलेली घरे खाल्ली गेली आहेत. हा अत्यंत गंभीर प्रकार असून दोषींना कुणालाही सोडणार नाही,"गरिबांचे रक्त पिणाऱ्या बिल्डरांना आम्ही सोडणार नाही. या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. भूमिअभिलेख विभागापासूनच या गैरप्रकारांची सुरुवात झाल्याचा आरोपही त्यांनी केला असून, लाचलुचपत विभागाकडेही हे प्रकरण पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.
दिंडोरीतील भीषण अपघातात ६ मुलांसह ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देत त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली असून, संबंधित विहीर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
१० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
स्वतःवर झालेल्या आरोपांबाबत बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, "माझ्या नावावर ८० एकर शेती दाखवली जात आहे, मात्र माझ्याकडे फक्त २८ एकर जमीन आहे." काही जण जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खरात प्रकरणाचे पुरावे पुढे आणा
अशोक खरात प्रकरणावर बोलताना मंत्री बावनकुळे यांनी ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी असल्याचे म्हटले. एस आय टी योग्य पद्धतीने तपास करत असून, ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी पुढे यावे, असे आवाहन केले. "अधिकाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही नीलम बनासारखी कठोर कारवाई केली जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
बारामती निवडणुक बिनविरोध व्हावी
बारामती निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी अजित पवार यांना सर्वमान्य नेता असल्याचे सांगत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी नाना पटोळे यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

